ठाण्यात पेप्सी- वेफर्सच्या गोडाऊनला आग, आगीत १३ वाहनं जळून खाक

राहुल क्षीरसागर
Friday, 19 February 2021

ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड मधील पेप्सी आणि वेफर्सच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली.

मुंबई:   ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड मधील पेप्सी आणि वेफर्सच्या गोडाऊनला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोडाऊनमध्ये पेप्सी आणि वेफर्स डिलिव्हरीसाठी माल भरलेली 13 वाहने या आगीच्या भक्षस्थानी गेले. दरम्यान ही आग मध्यारात्रीच्यावेळी लागल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. तसेच तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असल्याची माहिती ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने देण्यात आली.
 
ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरातील कोठारी कंपाऊंड येथे राजेंद्र खानविलकर यांच्या मालकीचा असलेल्या सहा हजार 200 चौ.फुटाच्या गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये पेप्सी आणि वेफर्स डिलिव्हरीसाठी भरलेल्या 13 वाहने उभी केली होती. गोडाऊनमधील मालासह ती वाहनेही या आगीचे शिकार झाले आहेत. गोडाऊनमध्ये ये- जा करण्यासाठी एक दरवाजा आहे. त्यातच ते बांधकाम ही जुने असल्याने गोडाऊनमध्ये शिरण्यासाठी जेसीबीचा मदतीने मागील बाजूची भिंत फोडून आता प्रवेश केला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक फायर वाहन, दोन जंम्बो वॉटर टँकर, दोन लहान वॉटर टँकर, एक रेस्क्यू वाहन आणि एक जेसीबी पाचारण केले होते. चार तासांनी आगीवर आटोक्यात आली तरी कुलिंग होण्यासाठी आणखी दोन तास गेल्याने शुक्रवारी सकाळी पूर्ण आगीवर नियंत्रण मिळविण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले. 

हेही वाचा- मुंबई पालिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील कोविड लसीकरणाला सुरुवात कधी?, जाणून घ्या

या आगीत 13 वाहनांमध्ये पाच टाटा टेम्पो, एक तीनचाकी टेम्पो, दोन टाटा इंट्रा, तीन टाटा 407 टेम्पो आणि एक मारुती कॅरी तसेच एक दुचाकीचा ही त्यामध्ये समावेश आहे. तर ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचा कयास वर्तवण्यात येत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी वर्तवली आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Wafers and Pepsi godown on fire in Thane 13 vehicles burnt


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wafers and Pepsi godown on fire in Thane 13 vehicles burnt