वाशीचा तिसरा खाडीपूल पर्यावरणाच्या कचाट्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शीव-पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्‍याजवळ तयार करण्यात येत असलेला तिसरा खाडीपूल पर्यावरणाच्या कचाट्यात सापडला आहे. उड्डाणपुलासाठी जवळपास दीड हेक्‍टर जागेवरील कांदळवने हटवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाला उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्‍यकता आहे.

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर वाशी टोलनाक्‍याजवळ तयार करण्यात येत असलेला तिसरा खाडीपूल पर्यावरणाच्या कचाट्यात सापडला आहे. उड्डाणपुलासाठी जवळपास दीड हेक्‍टर जागेवरील कांदळवने हटवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाला उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्‍यकता आहे. खाडीच्या वाशी आणि मानखुर्द अशा दोन्ही बाजूला असणारी ४४२ झाडे कापण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेनेही परवानगी दिलेली नाही. या दोन्ही परवानगी मिळाल्यास नोव्हेंबर अखेरीस कामाला सुरुवात होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालल्यामुळे वाशी टोलनाक्‍यावर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळातर्फे खाडी पुलाच्या शेजारी मुंबईच्या दिशेने व पुण्याच्या दिशेने दोन्ही कडेला तीन मार्गिकांचे उड्डाणपूल तयार केले जाणार आहेत. मुंबईकडील आणि पुण्याकडील दोन्ही बाजूला कांदळवनांचा अडथळा या प्रकल्पात आला आहे. सुमारे दीड हेक्‍टरवरील कांदळवने काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्याच्या अटीवर वनखात्याने याआधीच रस्ते विकास महामंडळाला परवानगी दिली आहे. परंतु, मार्गदर्शक सूचनांसाठी उच्च न्यायालयात कांदळवने लागवड आणि कापण्याबाबत परवानगी मिळवण्यासाठी रस्ते विकास महामंडळाची याचिका दाखल केली. ही परवानगी अद्याप न मिळाल्यामुळे सध्या रस्ते विकास महामंडळातर्फे वाहतूक परवानग्या मिळवण्याच्या मार्गावर आहे. 

कांदळवनांप्रमाणेच खाडीच्या दोन्ही बाजूला असलेली ४४२ झाडांची वृक्षसंपदाही अडचणीची ठरत आहे. वाशीच्या कडेला ३०५, तर मुंबई महापालिकेच्या हद्दीत येणारी १३७ झाडे तोडण्याची परवानगी रस्ते विकास महामंडळाला आवश्‍यक आहे. परंतु, त्या झाडांच्या बदल्यात दोन ते तीन पट नवीन झाडे लावावी लागणार असल्याने सध्या जागेची शोध मोहीम सुरू होती. त्यानुसार बोरिवलीतील एरंगल या परिसरात झाडे लावण्यात येणार आहेत; तर वाशीतील झाडांच्या बदल्यात टीटीसी औद्योगिक पट्ट्यातील सुमारे १.२ हेक्‍टर परिसरात ११८९ झाडे लावण्यात येणार आहेत. वाशी खाडीपुलावर तिसरा आणि चौथा उड्डाणपूल तयार करण्याचे काम एल ऍण्ड टी यांना देण्यात आले आहे; परंतु पर्यावरणासंबंधित परवानग्या रखडल्याने अद्याप कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. 

टोल केबिनची संख्या वाढणार 
वाशी खाडी पुलावर तिसरा आणि चौथा पूल तयार केल्यावर तब्बल २० टोल केबिन बसवण्यात येणार आहेत. सध्याच्या टोल केबिनची जागा अपुरी पडत असल्याने वाशी गावाजवळ दोन्ही मार्गिकांवर अनुक्रमे १० असे एकूण २० टोल केबिन बसवण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting for permission of Vashi's third bridge