तुर्भ्यातील क्‍लॉक टॉवरला प्रतीक्षा उद्‌घाटन वेळेची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

तुर्भ्यातील सेक्‍टर १९ येथील रामदास पाटील चौकात उभारण्यात आलेल्या नवी मुंबई शहरातील पहिल्या क्‍लॉक टॉवरच्या उद्‌घाटनासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसत आहे. या क्‍लॉक टॉवरचे काम पूर्ण झाले असूनदेखील ते उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत अडकले आहे.

नवी मुंबई ः तुर्भ्यातील सेक्‍टर १९ येथील रामदास पाटील चौकात उभारण्यात आलेल्या नवी मुंबई शहरातील पहिल्या क्‍लॉक टॉवरच्या उद्‌घाटनासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसत आहे. या क्‍लॉक टॉवरचे काम पूर्ण झाले असूनदेखील ते उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत अडकले आहे.

जून महिन्यात अंतिम टप्प्यातील कामाची पालिका आयुक्त एन. रामस्वामी यांनी पाहणी केली होती. लवकरात लवकर हा क्‍लॉक टॉवर जनतेसाठी खुला करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार सर्व कामे पूर्ण झाली असली तरी प्रशासनाला अद्याप उद्‌घाटनाची तारीख मिळाली नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. १४.५ मीटर उंचीच्या या आकर्षक क्‍लॉक टॉवरच्या चारही बाजूस मोठी घड्याळे असून, त्या भोवती नवी मुंबईची मूळ संस्कृती असणाऱ्या आगरी-कोळी व इतर आकर्षक शिल्पाकृती बसवण्यात आल्या आहेत. हा घड्याळ टॉवर नवी मुंबईच्या आकर्षण केंद्रात भर घालणारा ठरणार आहे. सायन-पनवेल महामार्ग, पाम बीच रोड, वाशी, अरेंजा कॉर्नरला जोडणाऱ्या रस्त्यांव्यतिरिक्त दिवस-रात्र वाहनांची तसेच नागरिकांची वर्दळ असल्याने या ठिकाणी हे ‘क्‍लॉक टॉवर’ उभारण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. या क्‍लॉक टॉवरसाठी तब्बल १७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. अशी माहिती तुर्भे विभागाकडून देण्यात आली.

क्‍लॉक टॉवरचे काम पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल महापौर जयवंत सुतार यांच्याकडे दिला जाईल. तसेच उद्‌घाटनाची तारीख जनसंपर्क कार्यालयाकडून लवकरच ठरवण्यात येईल.
- मनोज पाटील, कार्यकारी अभियंता, तुर्भे विभाग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waiting time for Clock Tower in Turbhe