पालीत पोलिस ठाण्याची भिंत कोसळली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

मुसळधार पावसामुळे ब्रिटिशकालीन जुने पोलिस ठाण्‍याची भिंत रविवारी कोसळली. त्यामुळे येथे जाणाऱ्या-येणाऱ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुळे ब्रिटिशकालीन जुने पोलिस ठाण्‍याची भिंत रविवारी कोसळली. त्यामुळे येथे जाणाऱ्या-येणाऱ्यांसाठी धोका निर्माण झाला आहे.

रामआळीजवळ ब्रिटिशकालीन जुने पोलिस ठाणे आणि न्यायालयाची वास्तू आहे. या ब्रिटिशकालीन वास्तूची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात गेल्‍या महिन्यात "सकाळ'ने बातमीही प्रसिद्ध केली होती. या इमारतीत पोलिस ठाणे, न्यायालय, तहसील, उपलेखा कार्यालयही होते. येथील सर्व कार्यालये इतर नवीन इमारतीत हलविण्यात आली आहेत. येथील तुटलेल्या खोल्या स्वच्छतागृह झाल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेली भिंतही ढासळली आहे. येथूनच रहदारीचा रस्ता जातो. त्यामुळे पादचारी, वाहनचालक व विद्यार्थ्यांना येथून जाते येतेवेळी धोका आहे. याबाबत तहसीलदार दिलीप रायन्नावर म्‍हणाले, की यासंबंधी योग्य माहिती घेऊन सांगतो, असे मागील महिन्यात सांगितले होते; मात्र त्यावर अजूनही काही झालेले नाही. 

खूप जुनी वास्तू आहे. वास्तू ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत नाही. ही जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग केली तर तिचा सदुपयोग करता येईल. 
- गणेश बाळके, सरपंच, पाली 

हा रहदारीचा मार्ग आहे. अनेक पालक पाल्यांना येथून शाळेत ने-आण करतात. त्यामुळे भिंत पुन्हा पडली तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन योग्य दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. 
- मिलिंद सातुर्डेकर, रहिवासी, पाली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wall of the police station collapsed in Pali