भटक्या श्वानांचे पनवेलमध्ये हत्याकांड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

तळोजा औद्योगिक क्षेत्रात मोडणाऱ्या पडघे गावात मागील काही दिवसांपासून भटक्‍या श्वानांवर विषप्रयोग करण्यात येत असून आतापर्यंत १० श्वानांची अशा प्रकारे हत्या झाली असल्याची तक्रार काँग्रेसचे पर्यावरण सेलचे विभाग अध्यक्ष सुनील भोईर यांनी केली आहे. दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. 

पनवेल : तळोजा औद्योगिक क्षेत्रात मोडणाऱ्या पडघे गावात मागील काही दिवसांपासून भटक्‍या श्वानांवर विषप्रयोग करण्यात येत असून आतापर्यंत १० श्वानांची अशा प्रकारे हत्या झाली असल्याची तक्रार काँग्रेसचे पर्यावरण सेलचे विभाग अध्यक्ष सुनील भोईर यांनी केली आहे. दरम्यान, पालिका अधिकाऱ्यांनी मात्र या वृत्ताचा इन्कार केला आहे. 

पालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून भटक्‍या श्वानांनी नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या श्वान निर्बीजीकरण केंद्राचे काम निविदा प्रक्रियेत अडकल्याने भटक्‍या श्वानांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. भटक्‍या श्वानांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेली पालिका यामुळे विरोधकांच्या टीकेची धनी ठरत आहे. श्वान निर्बीजीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. विषप्रयोगाच्या अशा आरोपामुळे पालिका प्रशासन आणखी गोत्यात येण्याची शक्‍यता आहे.

मागील वर्षीही भटक्‍या श्वानांनी पडघे गावात दीड वर्षीय बालकावर श्वानांनी हल्ला चढवत एकाच दिवसात १७ जणांना जखमी केल्याचे वृत्त ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. अशातच श्वानांवर होत असलेल्या विषप्रयोगामुळे श्वान मृत्यमुखी पडत असल्याने पालिकेचे रखडलेले श्वान नियंत्रण प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.अशातच श्वानांवर होत असललेल्या विषप्रयोगामुळे पालिकेचे रखडलेले श्वान नियंत्रण प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

श्वानांवर विषप्रयोग होत असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली आहे; मात्र आतापर्यंत दोनच श्वानांच्या बाबतीत हा प्रकार घडला असल्याचे दिसून आले असले तरी हा विषप्रयोग आहे का, हा संशोधनाचा विषय आहे.
-  दौलत शिंदे, 
आरोग्य अधिकारी, पालिका. 

मागील काही दिवसांत श्वान मृत्युमुखी पडल्याच्या घटना पाहायला मिळत असून, मरणाऱ्या श्वानांच्या तोंडातून येणाऱ्या फेसामुळे हा विषप्रयोग करून हत्याकांड घडवण्याचा प्रकार असण्याची शक्‍यता आहे. 
- सुनील भोईर, काँग्रेस पर्यावरण सेल अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wandering dogs slaughtered in Panvel