esakal | हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन करणार नाही!!
sakal

बोलून बातमी शोधा

Police Force

हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन करणार नाही!!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्यात सध्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन सदृश निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि आस्थापनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरात राहा आणि सुरक्षित राहा असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. पण असं असताना अद्यापही भाजीमार्केट, लोकल रेल्वे किंवा इतर ठिकाणी अपेक्षित निर्बंधांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. जनतेशी सौम्य भाषेत संवाद साधा आणि शक्यतो दंडुकांचा वापर करू नका असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पण पोलिसांच्या सौम्य व संयमी वर्तणुकीचा गैरफायदा घेत काही लोक त्यांच्यांशीच वाद घालताना दिसत आहेत. मास्क न लावल्यामुळे पोलिसांना एका नागरिकाला फटकारलं असता, त्या नागरिकाने थेट पोलिसालाच शिवीगाळ केल्याचीही घटना घडली आहे. अशा घटनांनंतर, 'हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही', असा इशाराच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना दिला आहे.

हेही वाचा: रेमडेसिवीर तयार पण सरकारी परवानगीमुळे रखडला पुरवठा

"गेल्या वेळचा लॉकडाउन आणि आताचा लॉकडाउन यात फरक आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये सारं काही बंद होतं. सध्याच्या लॉकडाउनमध्ये आपण अनेक आस्थापनांना निर्बंधातून सूट दिली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसोबत इतर काही छोट्या उद्योगांना पार्सल व होम डिलीव्हरी सुविधादेखील सुरू ठेवण्यास परवानगी आहे. अशा परिस्थितीत राज्यातील पोलिसांना संयमी राहण्याचे आदेश त्या त्या विभागातील प्रमुखांकडून देण्यात आले आहेत. लोक सध्या लॉकडाउनच्या मानसिकतेत नसून काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेले असू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर थेट दंडुका वापरणं बरोबर ठरणार नाही. पण अनेक ठिकाणी लोक काहीही काम नसताना बाहेर भटकताना दिसत आहेत. पोलिसांनी सौम्य भाषेत समजावल्यावर त्यांच्यावरच आवाज चढवण्याच्या काही घटना घडत आहेत. अशा नागरिकांना मी सांगू इच्छितो की पोलिसांच्या हातात दंडुका नाहीत म्हणून त्यांचा अपमान करू नका. वर्दीचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही", अशा इशाराच गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला.

हेही वाचा: मुंबईत बनवली जाणार कोरोनावरील लस

"मुख्यमंत्र्यांनी राज्यात काय चालू आणि काय बंद असावं याबद्दल नीट माहिती दिली आहे. वारंवार कल्पना देऊनही काही लोक किंवा अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेली काही आस्थापने सुरू असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी नियम मोडले जातील त्यांच्यावर जागीच कारवाई केली जाईल. पोलिसांना आणि प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की कोरोनाची भयावह साखळी तोडण्यासाठी कृपया साऱ्यांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नका. अतिशय महत्त्वाचं किंवा वैद्यकीय काम असल्यास तुमची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे पण जर नियम मोडणारे कोणी सापडले तर मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही", असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

(संकलन- विराज भागवत)

loading image