मुंबईकरांसाठी गुडन्यूज..! एपीएमसी मार्केट होणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नसल्यामुळे बंद करण्यात आलेले नवी मुंबईचे एपीएमसी मार्केट बुधवार (ता. १५) पासून सुरू करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नसल्यामुळे बंद करण्यात आलेले नवी मुंबईचे एपीएमसी मार्केट बुधवार (ता. १५) पासून सुरू करण्यात येणार आहे. कांदा-बटाटा व भाजी बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना मार्केट सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

महत्वाची बातमी ः बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरला कोरोनाची लागण; हॉस्पिटल सील करण्याची मागणी

मार्केट सुरू करताना त्यांच्या सूचनांप्रमाणे उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन हा सुरूवातीला १४ एप्रिलपर्यंत मर्यादीत होता; मात्र आता सरकारने हा लॉक डाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात एपीएमसी मार्केट बंद राहिल्यास अन्नधान्यांची टंचाई निर्माण होऊन नागरीकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी, माथाडी आणि वाहतूकदार यांनी घोषीत केलेला बंदचा निर्णय मागे घ्यावा, अशी सरकारतर्फे विनंती करण्यात आली. माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, धान्य मार्केटचे संचालक निलेश विरा यांनी बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या स्तरावर पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अडचणी दूर करण्याबाबत विनंती केली.

महत्वाची बातमी ः कोरोनाचा परिणाम : आजारी कैदी कारागृहातून थेट रस्त्यावर

बाजार आवारात होणारी ग्राहकांची गर्दी, शेतमाल घेऊन येणारी वाहने, व्यापाऱ्यांकडे कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, माथाडी कामगार आणि बाजारातील इतर घटकांना परवाने देण्यात येणार आहेत. तसेच बाजारात सामाजिक अंतर राहण्याच्या दृष्टीकोनातून कृती आराखडा तयार करावा. या आराखड्यात दररोज मार्केटमध्ये येणाऱ्या शेतमालाच्या वाहनांची आणि ग्राहकांची संख्या निश्चित करावी. याबाबतचे मुद्दे घेऊन विभागिय कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांनी हा आराखडा मंजूर करावा, असा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. 

महत्वाची बातमी ः चिंताजनक ! पुणे, मुंबईचा कोरोना मृत्युदर देशाच्या तुलनेत अधिक... 

दोन दिवसात कृती आराखडा तयार
येत्या दोन दिवसांत हा कृती आराखडा तयार करून बाजार पूर्ववत सुरू करण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. एपीमएसी मार्केटबाबत घेण्यात आलेल्या बैठकीला संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त संजय कूमार, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बाजार समितीचे प्रशासक अनिल चव्हाण, सहसचिव अविनाश देशपांडे आदी अधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washi apmc market starts from wednesday