शेवटी मुंबई महापालिकेनं करून दाखवलं, पालिकेच्या कामाची जागतिक स्तरावर दखल

शेवटी मुंबई महापालिकेनं करून दाखवलं, पालिकेच्या कामाची जागतिक स्तरावर दखल

मुंबईः कोरोना महामारीमुळे जगभरात रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढतोय. विकसित देशांसह सर्वच देशांमध्ये मृतांच्या आकडेवारीबाबत गोंधळ आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. अशातच रूग्ण तसेच मृत्यूची परिपूर्ण माहिती केवळ मुंबई महापालिकेकडेच असून त्यांच्या या कामाची दखल वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने घेतली आहे. 

कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा वॉशिंग्टन पोस्ट या जागतिक महत्वाच्या माध्यम समूहाने मागितली होती. मुंबईसह दिल्ली,चेन्नई आणि कोलकाता या शहरांचा त्यात समावेश होता. यापैकी केवळ मुंबई महापालिकेनेच मृतांच्या माहितीचा संपूर्ण आलेख सादर केला. काही राज्यांनी अपूर्ण माहिती दिली तर कोलकता शहर प्रशासनाकडे याची कोणतीही आकडेवारी नसल्याचे ही त्यांनी म्हटलंय.

कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले. मुंबईत मार्च 2020 मध्ये मार्च 2019 च्या तुलनेत कमी मृत्यू झाले. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी आणि रस्ते अपघातांचे घटलेले प्रमाण यामुळे हे मृत्यू कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

मे महिन्यात मुंबईत एकूण 12 हजार 963 मृत्यूंची नोंद झाली.  त्यात 2,269 मृत्यू हे कोरोनामुळे झालेत. तर मे 2019 मध्ये मृतांचा आकडा हा  6,832 इतका होता. लॉकडाऊनमुळे अगोदरचे मृत्यू उशिरा म्हणजे मे महिन्यात नोंदवण्यात आल्याने हा आकडा वाढला असल्याचे महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं. त्याशिवाय मुंबईत इतर जिल्ह्यांतील रुग्ण देखील उपाचारांसाठी येत असल्यानं मृतांच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे ही ते म्हणाले.

मुंबईतील रुग्णालयात होणाऱ्या सर्व मृत्यूंची नोंद वेळेत आणि योग्य प्रकारे करण्यात येते. त्यामुळे देखील मृत्यूच्या संख्येत वाढ होते. मुंबईतील सर्व रुग्णालयांना तेथील मृत्यूंची माहिती 48 तासांच्या आत कळवण्याचे आदेश देण्यात आले होते, अन्यथा कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला होता. यानंतर अगोदर झालेल्या 800 मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे ही चहल यांनी सांगितले.

आम्ही या कामात पारदर्शकता आणली आहे , अशी पारदर्शकता ठेवण्याची हिम्मत इतर शहरांनी दाखवावी असे ही चहल पुढे म्हणाले.

जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये कोरोना बाधित रुग्ण तसेच मृतांचा आकडा वाढतोय. मात्र त्यातील अनेक देशांकडे मृतांबाबतची इत्तंभूत माहिती उपलब्ध नसल्याचे ही वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलंय.  त्या तुलनेत मुंबई महापालिकेचे काम पारदर्शक असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलंय.  मुंबई पालिका आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करते या विरोधकांच्या आरोपानंतर वॉशिंग्टन पोस्ट च्या माध्यमातून मुंबई पालिकेच्या कामाची दखल घेतल्याने अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळणार असल्याचं चहल यांनी सांगितलं.

संपादनः पूजा विचारे

Washington Post take Mumbai Municipal Corporation's work covid 19 sitution

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com