ऐन गणेशोत्सवात पाणीप्रश्‍न गंभीर 

सकाळ वृत्‍तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

खारघर, तळोजात कमी दाबाने पुरवठा

खारघर : ऐन गणेशोत्सवात खारघर व तळोजा वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा तक्रारी करूनही सिडकोकडून दुर्लक्ष झाले. त्यामुळे नागरिकांनी सिडकोविरोधात तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. वसाहतीतील पाणीसमस्या दूर होण्यासाठी गणरायाला साकडे घालण्याची वेळ गणेशभक्‍तांवर आली आहे.

खारघर आणि तळोजा वसाहतीत काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणी समस्यांकडे सिडकोचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात मोर्चा, आंदोलन, निवेदने दिली; मात्र काहीही उपाययोजना झाली नाही. सिडको हद्दीतील वाढत्या पाणीसमस्यांची गंभीर दखल घेत पाणीपुरवठा विभागाने ऑगस्टमध्ये वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन परिसरातील पाणी समस्यांविषयी लेखी तक्रारी मागवल्या. त्यामध्ये खारघरमधून ५७; तर तळोजामधून १४ सोसायटीच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातील अनेकांच्या घरी आणि सोसायट्यांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात 
आली आहे.

गणेशोत्सवात पाणी समस्या दूर होईल, असे नागरिकांना वाटत होते; मात्र पाणी समस्या ‘जैसे थे’ आहे. गणेशोत्सवातही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागिरकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

तळोज्यात बैठक
तळोजा वसाहतीमधील २० सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पाणी समस्यांविषयी बैठक घेत गणेशोत्सव होताच सिडकोकडे पत्रव्यवहाराद्वारे पाणी समस्या सोडवण्याची मागणी केली जाईल. पत्र देऊनही दुर्लक्ष केल्यास सिडकोवर ‘हंडा मोर्चा’ काढण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.

खारघर सेक्‍टर ३४ मधील सरस्वती हाईटस्‌, रोझ, चौरंग सिद्धी, तपस्वी आराधना, गजानन, सरस्वती इन्क्‍लेव्ह, साई प्रसाद, स्कायलाईन या सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यात सिडकोकडे निवेदन देऊनही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे अनेक सोसायट्यांनी सिडकोच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले.
 - डॉ. स्वप्नील पवा,  रहिवासी. 

खारघर सेक्‍टर ११ मधील अनेक सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सिडकोने पाणी समस्यांविषयी जाहिरात देऊन तक्रारी मागवल्या; मात्र खारघरमध्ये काही सोसायट्यांपर्यंत ही जाहिरात न पोहोचल्याने अनेक सोसायट्यांना सिडकोच्या आवाहनाची माहिती मिळाली नाही.
- रमेश मेनन, रहिवासी, खारघर

तळोजा, खारघर वसाहतीत पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.
- गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, सिडको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water question serious in Ganeshotsav