पनवेलकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार 

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

जलशुद्धीकरण केंद्राला मिळणार अखंडित वीजपुरवठा 

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वायाळ येथील उपसा केंद्र आणि भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राला नियमित वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र एक्‍स्प्रेस फिडर बसवण्याचे काम अनेक वर्षे कागदावरच होते. मात्र लवकरच जलशुद्धीकरण केंद्राला स्वतंत्र फिडर बसवण्यात येणार आहे. यासाठी एजन्सीची नियुक्त करण्यात आली असून कार्यादेशही देण्यात आले आहेत. यामुळे पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली येथील पाणीपुरवठा सुरळीत होणार असून पाणीप्रश्‍न मार्गी लागणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेल, पनवेल येथे पाणीटंचाई निर्माण झाली होती. पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली येथे पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन जीर्ण झाली असल्याने या पाईपलाईनमधून ५० टक्के पाण्याची गळती होते. परिणामी, काही वर्षांपासून वसाहतींना पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. त्यातच पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार शटडाऊन घ्यावे लागते. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे. 

साडेचार कोटींचा खर्च; २२ के.व्ही. क्षमता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण; वायाळ येथील उपकेंद्रासाठी स्वतंत्र २२ के.व्ही. च्या एक्‍स्प्रेस फिडरची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात येणार आहे. यासाठी कार्यादेश काढले आहेत. योगीराज पॉवरटेक ही एजन्सीही नियुक्त केली आहे. साडेसहा कि.मी.चे काम येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती उपअभियंता अभियांत्रिकी सुरेंद्र भोसले यांनी दिली. त्यानंतर वायाळ उपसा केंद्राला अखंडित वीजपुरवठा होणार आहे. सर्व पंप कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे पनवेल आणि सिडको वसाहतीमधील नागरिकांची तहान भागणार आहे.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water question will be released