ठाणे : यंदा अवकाळी पाऊस तसेच मे महिन्यातच मॉन्सून दाखल झाल्याने जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यात जून महिन्यातही सुरुवातीपासूनच धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. असे असतानाही दुसरीकडे ठाणे पालिका क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून पाणीटंचाईच्या समस्या जाणवत आहे. ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याची वेळ ओढवली आहे.