दिवाळीच्या तोंडावर अंबरनाथमध्ये पाणीबाणी? चिखलोली धरणातून पाणीपुरवठा बंद

श्रीकांत खाडे
Tuesday, 10 November 2020

दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींनंतर अंबरनाथच्या चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) घेतला आहे. पर्याय म्हणून एमआयडीसीचे पाणी पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, एमआयडीसीकडूनही एक दिवसआड पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना ऐन दिवाळीत पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

अंबरनाथ : दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींनंतर अंबरनाथच्या चिखलोली धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) घेतला आहे. पर्याय म्हणून एमआयडीसीचे पाणी पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, एमआयडीसीकडूनही एक दिवसआड पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना ऐन दिवाळीत पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

अधिक वाचा : राज्याला कोरोनातून मोठा दिलासा! "होम क्वारंटाईन' रुग्णांत घट; दिवाळीनंतर संख्या वाढण्याची भीती

चिखलोली धरणाची उंची मागील वर्षांपासून अडीच मीटरने वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. यावर्षी पावसाळ्यात चिखलोली धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. पावसाळ्यात उंची वाढवण्याचे काम बंद होते, ते काम पुन्हा सुरू होइपर्यंत धरणातील पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची मागणी सर्वपक्षीयांनी लावून धरली होती. अखेर मागील महिन्यात ऑक्‍टोबरमध्ये धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. 

दरम्यान, शहरातील शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर आणि परिसरात 50 हजार लोकवस्ती असलेल्या भागाला चिखलोली धरणामधून सहा दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा चिखलोली धरणातून केला जातो. मात्र, हे पाणी दूषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या.

क्लिक करा : दहावी-बारावी अनुत्तीर्णांसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फेरपरीक्षा; विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी हेल्पलाईन

याबाबत विविध राजकीय पक्षांनी तक्रारी, आंदोलने केल्याने मंगळवारपासून (ता. 10) चिखलोली धरणातून होणारे पाणी वितरण बंद करण्यात आले आहे. चिखलोली धरणातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या कालावधीत एमआयडीसीकडून पाणी घेऊन त्याचा पुरवठा केला जाणार आहे. 

दूषित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. 
- एस. के. दशोरे, कार्यकारी अभियंता 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 

----------------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply to Ambernath city from Chikhloli dam stopped