
मुंबईतील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एस आणि एन विभागात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
Water Supply Close : घाटकोपर, विक्रोळी, भांडुपमध्ये उद्या पाणी नाही
मुंबई - मुंबईतील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एस आणि एन विभागात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे घाटकोपर, विक्रोळी, भांडुप येथील काही परिसरांमध्ये २ मार्च रोजी मध्यरात्री १२ ते ३ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
महानगरपालिकेतर्फे २ मार्च रोजी पूर्व उपनगरामध्ये भांडुप (पश्चिम) एस विभागातील क्वारी रोड या ठिकाणी १२०० मिलीमीटर व ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर दुरुस्ती कामामुळे गुरुवारी, २ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून शुक्रवारी, ३ मार्च, रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत एस आणि एन विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.
संबंधित परिसरातील नागरिकांनी सदर कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.