बोरिवली ते एनसीपीए अवघ्या अर्ध्या तासात!

मंगेश सौंदाळकर
रविवार, 15 जानेवारी 2017

सागरी वाहतुकीसाठी वॉटर टर्मिनस कॉर्पोरेशन स्थापन; 25 जानेवारीला निविदा मागवणार
मुंबई - शहरातील वाहतूक यंत्रणेला आता नवा पर्याय मिळणार आहे. सागरी वाहतुकीमुळे बोरिवलीपासून नरिमन पॉइंट येथील "एनसीपीए'पर्यंतचे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाकरिता वॉटर टर्मिनस कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे.

सागरी वाहतुकीसाठी वॉटर टर्मिनस कॉर्पोरेशन स्थापन; 25 जानेवारीला निविदा मागवणार
मुंबई - शहरातील वाहतूक यंत्रणेला आता नवा पर्याय मिळणार आहे. सागरी वाहतुकीमुळे बोरिवलीपासून नरिमन पॉइंट येथील "एनसीपीए'पर्यंतचे अंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाकरिता वॉटर टर्मिनस कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे.

मुंबईत वाहनांच्या तुलनेत रस्त्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मेट्रो आणि मोनो प्रकल्पांचे काम सुरू आहे. लोकल प्रवाशांना पर्याय म्हणून मेट्रोचे जाळे कुलाबा ते दहिसरपर्यंत विस्तारले जाणार आहे. काही वर्षांत हे प्रकल्प मार्गी लागतील. आता सागरी वाहतुकीमुळे उपनगरांतून दक्षिण मुंबईत येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बोरिवली ते एनसीपीए सागरी मार्गाकरिता प्रस्ताव तयार केला होता. या प्रकल्पाकरिता महामंडळाने सल्लागार नेमला होता. सल्लागाराने दिलेल्या माहितीवरून महामंडळाने प्रकल्पाकरिता निविदा मागवल्या होत्या; मात्र त्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने सागरी वाहतुकीचा प्रस्ताव महामंडळाने गुंडाळला होता.

दिल्लीतील बैठकीत बोरिवली ते एनसीपीए सागरी वाहतुकीबाबत नुकतीच चर्चा झाली. पश्‍चिम तटाचा विकास आणि पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी सागरी वाहतुकीचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. नव्या प्रस्तावानुसार बोरिवली, वर्सोवा, वांद्रे आणि एनसीपीए येथे जेट्टी तयार केली जाणार आहे. सागरी प्रकल्पाकरिता वॉटर टर्मिनस कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे. 25 जानेवारीला महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) निविदा मागवणार आहे. बोरिवली ते एनसीपीए सागरी मार्गामुळे उपनगरांतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल. नवी मुंबई-ठाणे सागरी मार्गाकरिताही प्रस्ताव मागवण्यात येणार असल्याचे समजते.

दीड हजार कोटींचा खर्च
बोरिवली ते एनसीपीए प्रकल्पाकरिता दीड हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकरिता केंद्र सरकारकडून काही निधी मिळणार आहे. त्यातून चार ठिकाणी जेट्टी बांधल्या जातील. पश्‍चिम तटावरील समुद्रात वाहतुकीकरिता विशिष्ट प्रकारच्या बोटींची गरज असते. त्या बोटींची खरेदी प्रकल्पाला मिळणाऱ्या निधीतून होईल. लवकरच मेरिटाइम बोर्डाकडून निविदा मागवल्या जातील. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल.

Web Title: water terminas corporation for sea transport