आम्ही सुरक्षितच! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

‘थॉमसन रॉयटर फाऊंडेशन’ने केलेल्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार भारत महिलांसाठी सर्वात धोकादायक देश ठरला आहे. लैंगिक हिंसाचार, मानवी तस्करी, भेदभाव आदी मुद्द्यांबाबत भारतातील परिस्थिती इतर देशांच्या तुलनेत भयावह असल्याचे सर्वेक्षण सांगते. भारतातील महिला खरेच धोकादायक स्थितीत जगत आहे का, याचा आढावा घेतला असता मुंबई अन्‌ महाराष्ट्र नक्कीच सुरक्षित आहे, असा सूर उमटला... 

सर्वाधिक धोकादायक देशांच्या यादीत भारतानंतर सिरिया-अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो; पण त्या देशांशी भारताची तुलना करणेच योग्य नाही. अनेक वेळा मुंबईतच काय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही मी एकट्याने फिरले आहे. कधीच भीती वाटली नाही. सिरियापेक्षा काय, जागातील अनेक देशांपेक्षा महाराष्ट्र महिलांसाठी नक्कीच सुरक्षित आहे. सर्व्हे कोणत्या आधारावर केला आहे हे कळले पाहिजे. पण मुंबई आणि महाराष्ट्र नक्कीच सुरक्षित आहे. 
- श्रद्धा जाधव, माजी महापौर 

कंपनीने रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी. मुळात महिलांनी स्वतःची काळजी घेतली, तर अनुचित प्रकार होणार नाहीत. सेल्फ डिफेन्स त्यांना माहीत हवे. आजकाल सोशल मीडियावर कुठे आहोत? काय करत आहोत? असे स्टेटस टाकले जातात. हा ट्रेंड बंद झाला पाहिजे. किमान त्यावर नियंत्रण तरी असावे. भारताच्या शहरातील महिला नक्कीच सुरक्षित आहेत.
- श्रद्धा भितळे, प्रोसेस अनॉलिसिस, टीसीएस 

कबड्डीच्या निमित्ताने मी अनेक देश फिरले आहे. भारतात महिला असुरक्षित आहेत, असे मला वाटत नाही. तसा अनुभव कधीच आला नाही. त्यामुळे ‘थॉमसन’चे सर्वेक्षण कोणत्या आधारावर झाले ते पाहावे लागेल.
- अभिलाषा म्हात्रे, कर्णधार,  भारतीय महिला कब्बडी संघ 

शहरांमधील महिला नक्कीच सुरक्षित आहेत. कौटुंबिक हिंसाचारही सध्या वाढत चालला आहे. वाद, हुंडा, स्त्रियांचे अश्‍लील प्रदर्शन, घटस्फोट, गर्भलिंग आदी विविध कारणांमुळे महिलांना मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागतो. हिंसाचारातून महिलेला संरक्षण देण्यासाठी काही कायदे आहेत. १९६१ च्या कायद्यानुसार हुंडा घेणे व देणे गुन्हा आहे. भारतीय संविधानात ३०४ (ख) व ४९८ (क) ही नवी कलमे आहेत. कौटुंबिक छळ प्रतिबंध कायदा, वैद्यकीय मदत अशा तरतुदी आहेत. नुसते रिक्षा किंवा गाडीच्या मागे ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ असे लिहून चालणार नाही. महिलांच्या समस्या रोखण्यासाठी मानसिकता बदलायला हवी. 
- ॲड. सीमा पवार 

भारतात धर्म, शिक्षण अन्‌ संस्कृती यांच्यात खूप तफावत आहे. म्हणजे एकीकडे तुम्हाला कंपनीची सीईओ असणारी स्त्रीही पाहायला मिळते आणि दुसरीकडे नवऱ्याचा रोज मार खाणारी अबलाही... त्यामुळे भारत महिलांसाठी धोकादायक असल्याबाबतचे सर्वेक्षण कसे केले, हा खूप मोठा प्रश्‍न आहे. दिल्ली, बिहार आदी काही भागांत आजही महिला सातनंतर बाहेर एकट्या जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे मुंबई, पुणे, बेंगळुरु आदी काही ठिकाणी आजही रात्री १ वाजता स्त्रिया टू-व्हिलरवरून एकट्या फिरू शकतात. मला वाटते की अशी तफावत शिक्षण-संस्कृतीमुळे निर्माण झाली आहे. भारतातील काही जणांची विशेषतः काही भागांतील पुरुषांची शैक्षणिक परिस्थिती सुधारली तर चित्र बदलू शकते.
- शर्वरी जमेनिस, अभिनेत्री 

‘थॉमसन रॉयटर फाऊंडेशन’ने महिला असुरक्षिततेबाबत काढलेला निष्कर्ष  हा नक्कीच धक्कादायक आणि भयंकर आहे. एकीकडे भारत जगात महासत्ता होणाची स्वप्ने पाहत आहे आणि अशा देशात मानवी विकासाचा निर्देशांक खूपच घसरत चालला आहे. एकूणच देशाची जडणघडण आणि विकासात महिलांचा मोठा वाटा आहे. ज्या देशात महिला असुरक्षित आहेत, तो देश महासत्ता होईल, असे कसे म्हणता येईल? भारत देश हा जीजामाता आणि झाशीच्या राणीचा मानला जातो; त्यात स्त्रियांची अशी अवस्था असेल तर भवितव्य धोक्‍यात आहे. स्त्रियांनीही स्वसंरक्षणाबाबत जागरुक असायला हवे. 
- उल्का महाजन,  सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: We are safe in mumbai & maharashtra