लोकसभेत उपाध्यक्ष पद आम्हालाच हवा : शिवसेनेचा आग्रह

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जून 2019

लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

मुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे शिवसेनेला भाजपकडून आणखी अपेक्षा आहेत. लोकसभा अध्यक्षांची निवडणूक १९ जून रोजी होणार आहे. याबाबत मेनका गांधींसह भाजपच्या काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे शिवसेनेने लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे. मात्र, भाजप हे पद शिवसेनेला देईल का, याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण ‘एनडीए’त नसलेल्या बीजेडी किंवा वायएसआर आदी पक्षांना उपाध्यक्षपद देऊन राज्यसभेतील बहुमताची बेगमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याची कुणकुण शिवसेनेला लागताच त्यांनी लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार असल्याचे वक्तव्य केले आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेनेचे सर्वाधिक खासदार निवडून आले आहेत. प्रादेशिक पक्ष बीजेडीचे १३, तर जगनमोहन रेड्डींच्या पक्षाचे २२ खासदार निवडून आले आहेत. या दोन पक्षांना चुचकारत जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We want Vice President post in the Lok Sabha Shiv Sena