esakal | आम्ही ईडी नाही; सीडी लावणार, प्रसाद लाड यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही ईडी नाही; सीडी लावणार, प्रसाद लाड यांचा इशारा

आम्ही ईडी नाही; सीडी लावणार, प्रसाद लाड यांचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना काळात (corona situation) मुंबई महापालिकेत (bmc) कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. ही प्रकरणे बाहेर काढून शिवसेनेचा (shivsena) खरा चेहरा लोकांना कळावा म्हणून आता ईडी नव्हे, तर त्यांच्या भ्रष्टाचाराची सीडी लावणार, असा इशारा भाजपचे (bjp) राज्य उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी दिला. ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात त्यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. (We will play cd not ed bjp leader prasad lad warns opposition dmp 82)

गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे; मात्र आतापर्यंत शिवसेनेला मुंबईतील समस्यांवर तोडगा काढता आला नाही. उलट पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला. गेल्या पालिका निवडणुकीवेळी युतीत निवडणूक लढवली. या वेळी मात्र आम्ही स्वबळावर लढणार असून पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे आमचे स्वप्न आहे. पालिकेवर कमळ फुलवण्याचा आम्ही विडा उचलला आहे. शिवसेनेच्या कार्यपद्धतीमुळे मुंबईच्या विकासावर झालेला परिणाम, रखडलेली विकासकामे आदी मुद्दे घेऊन आम्ही जनतेत जाऊ आणि जनता नक्कीच आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद देईल, असा विश्‍वास लाड यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची सीडी लावणार

कोविड काळात केलेल्या कामाचे श्रेय शिवसेना आणि पालिका प्रशासन घेऊ पाहत आहे; मात्र यात सर्वांचा सहभाग आहे. कोविड काळात मुंबईसाठी नगरसेवक, आमदार, खासदार, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी एकत्र काम केले; मात्र यासाठी ठराविक लोकांचे कौतुक होणे योग्य नाही. यादरम्यान शिवसेनेने जो भ्रष्टाचार केला, ती प्रकरणे बाहेर काढणार आणि केंद्र सरकारपर्यंत पोचवणार असून शिवसेनेचा खरा चेहरा लोकांना कळावा, यासाठी आता ईडीची नाही तर त्यांच्या भ्रष्टाचाराची सीडी लावणार आहोत.

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत

गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे राज्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना राज्य कारभाराचा अनुभव नाही. कारभार कसा चालतो, त्यांना माहीत नाही. निधीविवरण कसे होते, याबाबत त्यांना पुरेसे ज्ञान नाही; मात्र मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीकडून प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडले जात आहे. सर्व गोष्टी केंद्र सरकार करणार; मग मुख्यमंत्री केवळ घरात बसणार का?

हेही वाचा: 8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप

भाजपत अंतर्गत धुसफूस नाही

भाजप हा ‘केडर बेस’ पक्ष आहे. जनसंघाच्या इतिहासापासून आपण पाहिले, तर भाजपमध्ये ‘केडर’ला फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे मोठे पद कोणाकडे किंवा नेतृत्व कोण करतेय, याला फारसे महत्त्व दिले जात नाही. २०१४ नंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पक्षाची धुरा सांभाळली. त्यानंतर अनेक नेते भाजपकडे वळले. आताही मंत्रिपद देताना सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला गेला. हा एक नवा प्रयोग होता. त्यामुळे पक्षामध्ये नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न झाला आहे.

loading image