मास्क घाला नाहीतर; विना मास्क बाहेर पडणं पडेल चांगलंचं महागात, BMC करणार कठोर कारवाई 

पूजा विचारे
Tuesday, 15 September 2020

पालिकेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून लोकं मास्क शिवाय फिरत असल्याने मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलीय. त्यामुळे पालिकेने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय़ घेतला आहे.

मुंबईः कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. मुंबई शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कोरोना काहीसा नियंत्रणात आला होता. मात्र सद्यपरिस्थितीत पुन्हा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढलेला दिसतोय. पालिकेच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून लोकं मास्क शिवाय फिरत असल्याने मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलीय. त्यामुळे पालिकेने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय़ घेतला आहे.

कोरोनाची लागण झालेल्या मुंबई महापालिकेच्या महापौरी किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. मास्क न घालता घराबाहेर पडू नका. माझंच पाहा, माझ्याकडून नक्की काहीतरी चूक झाली असेल. म्हणून मला कोरोनाचा विळखा पडला. तुम्ही मात्र असं करू नका. कुठेही जा, बाजरात जाताना सुद्धा पण मास्क घाला. विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं. त्यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे. 

मास्क वापरणं बंधनकारक असतानाही बहुतांश नागरिक मास्क वापरताना दिसत नाही. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात गणेशोत्सव साजरा केला गेला. तर 31 ऑगस्ट पासून अनलॉक 4 ला सुरूवात झाल्यानं अनेक गोष्टी शिथिल झाल्या. लोकं मोठ्या प्रमाणावर घरातून बाहेर पडली. रस्त्यांवर,बाजारात गर्दी होऊ लागली. दुकानांवर पूर्वी सारखीच झुंबड उडू लागली. अनेक लोकं तर मास्क शिवाय फिरू लागली. सामाजिक अंतर राखल्याचे कुठेही दिसत नाही. यामुळे गेल्या  15 ते 20 दिवसांपासून मुंबईतील बाधित रूग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढू लागल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर महापालिकेनं आता एक भरारी पथकाची नियुक्त केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर हे पथक लक्ष ठेवणार आहे. मास्क लावला नसेल तर 200 रुपये दंड भरणं बंधनकारक असल्याचं आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती दिली आहे. 

अधिक वाचाः  मुंबईत शुक्रवारपर्यंत कसा असेल पाऊस, वाचा हवामानाचा अंदाज

लोकांनी मास्क घालूनच बाहेर पडावे, आवश्यक सामाजिक अंतर ठेवावे याबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत. यानंतर पालिकेने लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे अतिर्कत आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मात्र तरीदेखील अनेक लोकं निर्देशांचं उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा लोकांमुळे मुंबईत पुन्हा एकदा रूग्णांचा आकडा वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे काकाणी यांनी पुढे सांगितले.

मास्क न वापरणाऱ्यांवर कडक लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश विभाग कार्यलयांना देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक वॉर्डात 15 जणांची टीम याप्रमाणे 24 वॉर्डात 360 जण मास्क न लावणाऱ्यांचा शोध घेतील. नाक आणि तोंडावर मास्क लावला नसेल तर त्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात येईल. मात्र, दंड वसूल करणं हे ध्येय नाही, पण नागरिकांमध्ये मास्क वापरण्याबाबत जनजागृती करणं गरजेचं असल्याचही आयुक्तांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचाः  सरकारच्या धोरणामुळे मध्यम आकाराची अडीच हजार रुग्णालये बंद होण्याच्या मार्गावर- IMA

ज्या विभागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे किंवा ज्या विभागातून अधिक तक्रारी आल्या आहेत तिथून या दंडात्मक कारवाईला सुरूवात केली असल्याचे ही काकाणी यांनी सांगितले. 

एप्रिल महिन्यापासून पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. त्यातून पालिकेने पाच महिन्यात 27 लाख रूपयांचा दंड ही आकारला होता. मात्र या कारवाईस अनेक लोक प्रतिनिधींना विरोध केल्याने ही कारवाई काहीशी थंडावली होती. लॉकडाऊनमध्ये अश्या प्रकारे दंडात्मक कारवाई करणे योग्य नसल्याचे काही लोकप्रतिनिधींचे म्हणणे होते. यानंतर पालिकेने लोकांमध्ये जनजागृती करण्यास अधिक भर दिला होता.

Wear a mask otherwise BMC will take strict action


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wear a mask otherwise BMC will take strict action