esakal | महाड शहरात पूरस्थिती; सावित्री नदीच्या पुराचं पाणी शहरात, नागरिकांमध्ये घबराट
sakal

बोलून बातमी शोधा

महाड शहरात पूरस्थिती; सावित्री नदीच्या पुराचं पाणी शहरात, नागरिकांमध्ये घबराट

सोमवारपासून महाडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ आणि गांधारी नद्या तुडुंब भरुन वाहू लागल्यात. यामुळे महाड शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

महाड शहरात पूरस्थिती; सावित्री नदीच्या पुराचं पाणी शहरात, नागरिकांमध्ये घबराट

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. सोमवारपासून महाडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ आणि गांधारी नद्या तुडुंब भरुन वाहू लागल्यात. यामुळे महाड शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहरात विविध भागांत सावित्री नदीच्या  पाणी शिरल्याने नागरिक, व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

नद्या-नाले ओसंडून वाहत असून महाड शहरात पूरस्थिती कायम आहे. सावित्री नदीच्या पुराचं पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झालं. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

जिल्ह्यात २४ तासात १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. माणगाव येथे सर्वाधिक ३२६ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. महाडमधून १०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून चार रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्यात. 

अतिवृष्टीमुळे घोणसे घाटात दरड कोसळली आहे. घोणसे घाटात दरड कोसळल्याने माणगावकडून श्रीवर्धनला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसंच दस्तुरी नाका येथेही पाणीवर आल्यानं सकाळपासूनच दस्तुरी नाका ते नातेखिंड हा मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीस बंद ठेवण्यात आला.  केंबुर्लीनजीक असलेल्या गांधारी पुलावरून पुराचे पाणी गेल्याने, महाड शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. दासगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीतील पाणी शेतीमध्ये घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. 

हेही वाचाः  नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका,  कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

महाड शहरांमध्ये गांधारी नाका आणि दस्तुरी नाका या मार्गाने शहरात प्रवेश करता येतो. मात्र मंगळवारी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.

नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला

सावित्री नदी अजूनही धोका पातळीच्यावर आहे. सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी ६.५० मीटर असून, ही धोक्याची पातळी नदीने ओलांडली आहे. सकाळी ९ वाजता पातळी ७.३० मीटर झाली होती. त्यामुळे महाड शहरात पूरस्थिती कायम आहे. 

शहरातील दस्तुरी नाका, बाजारपेठ, गांधारी पूल, सुकट गल्ली परिसरात दोन ते अडीच फूट पाणी आहे. मुसळधार पावसाने महाड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं नगरपरिषद, महसूल प्रशासन, पंचायत समितीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अधिक वाचाः  BKC च्या पंपिंग स्टेशनवरुन शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा टक्कर! कलानगरला झुकते माप देत असल्याचा भाजपचा आरोप

या नदीवरील दादली पुलावरून या नदीचा प्रवाह संध्याकाळी वाहू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. या पुलावरून वाहतूक बंद झाल्याने नदीपलीकडील अनेक गावांचा महाड शहराची संपर्क तुटला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वृक्ष उन्मळून पडणे, सखल भागात पाणी साचणे, विद्युत पुरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

Weather update heavy rainfall Raigad mahad savitri river overflow

loading image