
Wedding card on Napkin : हात रुमालावर लग्न पत्रिका, डहाणूतील पोलीस कुटुंबीयांची ही पत्रिका एकदा बघाच
- महेन्द्र पवार
महाराष्ट्रात सध्या अनेकजण आगळीवेगळी लग्न पत्रिका छापण्यास पसंती देतात. डहाणूमधील एका कुटुंबाने हात रुमालावर पत्रिका छापून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या लग्न सराईची धूम सुरु असून लग्न कार्य आलं म्हटल्यावर अनोख्या लग्न पत्रिकेचा विचार सुरु होतो.
लग्नाची पत्रिका आकर्षक असली पाहिजे किंवा वेगळ्या धाटणीची असली पाहिजे, अशी अनेकांची अपेक्षा असते. त्यामुळे कुणी पारंपारीक पध्द्तीने, तर कुणी वेगळं पण जपत कल्पकतेने लग्न पत्रिका छापून लग्नाचे निमंत्रण देतात. आज वर अनेक आकर्षक आणि वेगवेगळ्या लग्न पत्रिका पाहिल्या असतील. परंतु डहाणूत चक्क हात रुमालावर लग्न पत्रिका छापली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाहतूक शाखेतील सहायक पोलीस उप निरीक्षक असलेल्या दामसे कुटूंबियांनी आपल्या मुलाची लग्न पत्रिका वेगळपण जपत हात रुमालावर छापली आहे. आपण नेहमीच खिशात रुमाल ठेवतोच,
त्याच पांढऱ्या शुभ्र हात रुमालावर ही पत्रिका छापली आहे. ही पत्रिका आकर्षक तर आहेच, शिवाय धुतल्यानंतर निमंत्रण दिलेल्या व्यक्तीच्या उपयोगात ही येणार आहे. एका पत्रिकेसाठी दामसे कुटुंबियांना 15 रुपये खर्च आला असून देव देवतांचा चित्राची विटंबना होऊ नये यासाठी पत्रिकेवर आदिवासी वारली चित्र छापण्यात आले आहे.
पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश
आकर्षक आणि विविध रंगाच्या, सुगंधित अशा महागड्या लग्न पत्रिका बाजारात उपलब्ध आहेत. परंतु लग्नानंतर या पत्रिका अडगळीत पडलेल्या असतात. तर काही पत्रिका कचऱ्याच्या ठिकाणी पाहायला मिळतात. यामुळे पत्रिकेवर असलेल्या देवांची विटंबना तर होतेच.
शिवाय झाडापासून बनलेल्या कागदाचा ऱ्हास होतो. पर्यावरण प्रेमी असलेल्या रवींद्र दामसे आणि उज्वला दामसे दाम्पत्यानी वेगळं पण जपत हात रुमालावर लग्न पत्रिका छापत पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे.