पावसाळ्यानंतर धावणार पश्‍चिम रेल्वेवर एसी लोकल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई - बहुचर्चित वातानुकूलित (एसी) लोकल मध्य रेल्वेवरील सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर गुरुवारी रात्री पश्‍चिम रेल्वेवर दाखल झाली. या लोकलच्या पश्‍चिम रेल्वेवर तीन ते चार महिने चाचण्या होणार असून, त्यानंतरच ती प्रवाशांच्या सेवेत येईल. पावसाळ्यानंतरच ती धावू लागेल.

एसी लोकल वर्षभरापूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात आली. चाचण्या सुरू असतानाच ही लोकल चालविण्यास मध्य रेल्वेने नकार दिला. मात्र पश्‍चिम रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर पश्‍चिम रेल्वेवरील चाचण्यांना मंजुरी देण्यात आली. त्याआधी मध्य रेल्वेवरील सर्व चाचण्या पूर्ण करून ही लोकल आता पश्‍चिम रेल्वेत दाखल झाली आहे. या लोकलच्या तीन-चार महिने चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर ती पश्‍चिम रेल्वेवर धावू लागेल. पश्‍चिम रेल्वेवर महालक्ष्मी ते माहीमदरम्यान कमी उंचीचे पूल आहेत. रेल्वेचे रूळ आणखी खाली करून यावर मात केली जाईल. चर्चगेट ते बोरिवली आणि चर्चगेट ते अंधेरीदरम्यान अशा लोकल चालविण्यात येतील. एसी लोकलच्या दररोज 12 फेऱ्या होतील.

सहा हजार प्रवाशांची क्षमता
एसी लोकल 5 हजार 964 प्रवाशांची वाहतूक करू शकेल. एक हजार 28 प्रवासी बसून आणि चार हजार 936 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. लोकलचा जास्तीत जास्त वेग ताशी 110 किलोमीटर आहे.

Web Title: western railway ac locan after rainy season