बेस्टचे २० कोटी थकवणाऱ्या राज्य सरकारवर काय कारवाई?

बेस्टचे २० कोटी थकवणाऱ्या राज्य सरकारवर काय कारवाई?

मुंबई,-  बेस्ट उपक्रमाचा वीज विभाग ग्राहकांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करतो. राज्य सरकारकडे २० कोटी रुपयांची थकबाकी असताना अशी कारवाई का केली जात नाही, असा सवाल मंगळवारी (ता. २६) बेस्ट समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला केला.

बेस्ट प्रशासनाने ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीतील वीजखरेदी आणि पुरवठ्याबाबतचा सांख्यिकी अहवाल मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सादर केला. त्या वेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि बेस्ट समितीचे सदस्य रवी राजा यांनी प्रशासनावर टीकास्त्र सोडले. बेस्टचा वीज विभाग थकबाकी वसूल करण्यासाठी सामान्य, गरीब वीजग्राहकांचा पुरवठा खंडित करतो; मात्र कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेले राज्य सरकार आणि बड्या व्यावसायिक ग्राहकांवर मेहेरबानी दाखवली जात आहे असा आरोप त्यांनी केला.

अवघ्या चारपाच हजारांची थकबाकी असलेल्या वीजग्राहकांना संधी न देता जोडणी कापून त्यांच्या घरात अंधार केला जातो. वीजग्राहकांच्या मुलांच्या परीक्षा सुरू असतानाही कारवाई केली जाते. नियम सर्वांना सारखाच असतो; मग बेस्ट प्रशासन २० कोटींची थकबाकी असलेल्या राज्य सरकारची वीज का कापत नाही? थकबाकी असलेल्या महापालिकेची वीज का खंडित करत नाही, असे सवाल त्यांनी केले. 

अनेक वीजग्राहकांना दागिने गहाण ठेवून देयक भरावे लागत आहे. अनेक जणांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पाणी पोहोचत नाही, असे राजा म्हणाले. पाच हजारांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा कापण्यात येतो. पाच लाखांची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा त्यांनी बेस्ट प्रशासनाला केली. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असतानाच बेस्टने कारवाई का सुरू केली? सरकारकडे २० कोटींची थकबाकी आहे; मग कारवाई करण्याची हिंमत दाखवणार का, असे प्रश्‍न बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांना केले. मला आमदारांचे दूरध्वनी येतात; बेस्टकडून होत असलेल्या कारवाईबाबत विचारणा केली जाते असेही ते म्हणाले.

मीटर सदोष... देयक भरमसाट
वीजमीटरचे रीडिंग दिसत नसतानाही एका ग्राहकाला ३६ हजारांचे देयक पाठवण्यात आल्याचा प्रकार बेस्ट समितीचे सदस्य दत्ता नरवणकर यांनी उघडकीस आणला. त्याची थकबाकी सुमारे पाच हजार रुपयांची होती. हा वीजग्राहक त्यातील निम्मी रक्कम भरण्यास तयार होता; मात्र अधिकाऱ्यांनी त्याची विनंती धुडकावली, असे नरवणकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com