भाजपने 5 वर्षात कमावलं पण अवघ्या 3 दिवसात गमावलं ?

भाजपने 5 वर्षात कमावलं पण अवघ्या 3 दिवसात गमावलं ?

सत्तेच्या आहारी जाणं किती महागात पडू शकतं याची एव्हाना भाजपला प्रचिती आली असेलच. काल परवापर्यंत राज्यात तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपनं 2014 च्या निवडणुकीत अशी काही मुसंडी मारली की सर्वांनाच धडकी भरली. शिवसेनेची साथ घेत भाजपनं 5 वर्ष राज्याचा गाडा सन्मानानं हाकला. यात सरकार म्हणून काही निर्णय भाजपची प्रतिमा उंचावणारे ठरले.


5 वर्षात काय कमावलं ?

  • सत्तेत येताच फडणवीस सरकारनं रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली 
  • मेट्रो प्रकल्पांच्या माध्यमातून दळणवळणाला चालना देण्याचा प्रयत्न केला
  • डिजीटलायझेशनच्या माध्यमातून सरकारी कार्यालयांच्या कामाला गती दिली
  • जलयुक्त शिवार योजनेतून दुष्काळग्रस्त भागाला दिलासा दिला
  • सर्वात महत्वाचं म्हणजे राज्याला भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचा प्रयत्न केला.

याच भांडवलाच्या जोरावर भाजप 2019 च्या निवडणुकीत उतरली. सत्तेचं सोपान गाठण्यासाठी उराशी अतिआत्मविश्वास असला तरी त्यावर महायुतीचा अंकुश होता. निवडणुकीत अपेक्षेइतकं यश आलं नसलं तरी 5 वर्षांच्या पूर्वपुण्याईवर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. सेना-भाजप महायुतीत असले तरी शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी अडी मारल्यानं भाजपची ऐनवेळी गोची झाली. अशातच सुरू झाला सत्ताबाजार

सत्ताबाजार 

शिवसेनेनं भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. पण तिथेही भाजपनं संयम दाखवला. शांत राहून सगळं सहन करण्याची भाजपची प्रगल्भता जनतेला भावली. लोकांनी भाजपला सहानुभूती मिळत असतानाच भाजपनं एका रात्रीत सत्तेचा खेळ केला आणि तिथेच माशी शिंकली. अजित पवारांच्या मदतीनं चोरी छुप्या मार्गानं नव्या सरकारचा शपथविधी झाला.

महाराष्ट्रातल्या जनतेला हीच बाब खटकली. आता सत्तेसाठी घोडेबाजार होणार हे उघड असल्यानं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी जागता पहारा सुरू केला. सत्तेसाठी भाजपकडून सुरू असलेला प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला गेला. आणि अवघ्या तीन दिवसात राजीनामा देण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. 

जी प्रतिष्ठा कमावण्यासाठी भाजपला 5 वर्ष लागली तीच प्रतिष्ठा अवघ्या तीन दिवसात गमावली असं आता सर्वसामान्य जनतेकडून बोललं जातंय. सत्तेचं सिंहासन कधी कुणाला आणि कसं अस्मान दाखवेल हे आता भाजपलं चांगलंच उमगलं असेल.

WebTitle : what BJP earned in last five years lost in three days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com