कोरेगाव-भिमा प्रकरण आणि ‘वॉर अँड पिस’ काय आहे संबंध?

टीम ई-सकाळ
Thursday, 29 August 2019

सोशल मीडियावरील चर्चेची आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल कोर्टाने घेतली असून, त्यात सुनावणी दरम्यान टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पिस’ पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला नव्हता.

मुंबई/पुणे : कोरेगाव-भिमा प्रकरणातील संशयित आरोपी आणि एल्गार परिषदेचे वर्नोन गोन्साल्विस यांना मुंबई हायकोर्टाने विचारलेल्या एका प्रश्नावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. एका पुस्तकावरून ही चर्चा सुरू झाली असून, सोशल मीडिया यूजर्सनी या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही गोवले आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या ‘सुनावणी दरम्यान वर्नोन गोन्साल्विस यांना कोर्टाने लिओ टोल्सटॉयच्या ‘वॉर अँड पिस’ पुस्तकावरून एक प्रश्न विचारला आहे.

‘वॉर अँड पिस पुस्तक आणि इतर सीडींसारखे ‘आक्षेपार्ह साहित्य’ तुम्ही तुमच्या घरात कशासाठी ठेवले?’ असा प्रश्न हायकोर्टाने विचारला आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश सारंग कोटवल यांच्यापुढे गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायाधीशांनी गोन्साल्विस यांना हा प्रश्न विचारल्याने त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ‘हे पुस्तक आणि यांसारखे इतर साहित्य हे राष्ट्रविरोधी असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चेची आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल कोर्टाने घेतली असून, त्यात सुनावणी दरम्यान टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पिस’ पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. तर विश्वजीत रॉय यांच्या ‘वॉर अँड पिस इन जंगलमहल’ या पुस्तकाचा उल्लेख केला होता, असे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वेदनादायी असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

मुळात लिओ टॉलस्टॉयचे ‘वॉर अँड पिस’ हे पुस्तक नेपोलिनच्या काळातील युद्धाविषयीचे आहे. वर्षभरापूर्वी पोलिसांनी गोन्साल्विसयांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या साहित्यात हे पुस्तक होते. आता कोर्टाच्या प्रश्नानंतर अनेकांनी सोशल मीडियावर ‘माझ्याही घरात हे पुस्तक आहे,’ अशा अशयाच्या कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. गोन्साल्विस यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये काही सीडींचा समावेश होता. त्यात कबीर कला मंचच्या ‘राज्य दमन विरोधी’, ‘जयभीम कॉम्रेड’ या सीडींचा समावेश आहे. तसेच पुस्तकांमध्ये ‘वॉर अँड पिस’सोबत ‘अंडरस्टँडिंग माओइस्ट’, ‘आरसीपी रिव्ह्यू’ या पुस्तकांचा आणि नॅशनल स्टडी सर्कलच्या काही नियतकालिकांचा समावेश आहे. 

या प्रकरणावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली असून, या सगळ्याचे वर्णन ‘न्यू इंडिया’, असे उपहासात्मक केले आहे. 

काय आहे ‘वॉर अँड पिस’?
‘वॉर अँड पिस’ पुस्तक पहिल्यांदा 1869मध्ये रशियन भाषेत लिहिण्यात आले. त्यानंतर 1899मध्ये त्यांचा इंग्रजीत अनुवाद करण्यात आला. टॉलस्टॉय हा जगातील महान विचारवंत आणि लेखकांपैकी एक आहे. जगातील अनेक देशांमधील अब्जावधी लोकांवर त्याच्या विचारांचा प्रभाव आहे. मुळात महाराष्ट्र राज्य सरकारनेच 1977मध्ये या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. प्रा. आ. ना. पेडणेकर यांनी अनुवादीत केलेल्या त्या पुस्तकाचे नावे ‘युद्ध आणि शांती’ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is relation between Koregaon Bhima case and War and Peace