#BLOG : काय चाललेय जगात?

#BLOG : काय चाललेय जगात?

अमेरिकेत दूध नाल्यात, कांदे खड्ड्यात..

हजारो लिटर दूध नाल्यात फेकून दिले जात आहे. शेतकरी कित्येक क्विंटल कांदे जमिनीत पुरत आहेत. शेतातली भाजी ट्रॅक्टरखाली चिरडली जात आहे. ती जमिनीत गाडली जात आहे…

हे वर्णन महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणत्याही राज्यातील नाही. ते आहे आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक बळी गेलेल्या अमेरिकेतील. 

एकीकडे किराणा दुकानात सामान नाही. साधा पास्ता, टॉयलेट पेपरचे रोल घेण्यासाठी मारामारी होत आहे. आणि दुसरीकडे अमेरिकेत रोज 37 लाख लिटर दूध फेकले जात आहे, तर दर आठवड्याला साडेसात लाख अंडी नष्ट केली जात आहेत. यातील काही शेतकरी आपला माल फेकून देण्याऐवजी अन्नपेढ्या किंवा 'मिल्स ऑन व्हील्स’ यांसारख्या उपक्रमांस दान करीत आहेत. काही माल शीतगृहात ठेवला जातो, पण तीही आता ओसंडून वाहत आहेत. अमेरिकेतील कांदा उत्पादकांपेक्षा दूध उत्पादक जास्त चिंतेत आहेत. या मोसमात गाई जास्त दूध देत असतात. त्यामुळे देशातील सध्या किमान पाच टक्के दूध फेकले जात आहे. त्यात काही दिवसात अधिक वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. आता हेच बघा क्लेव्हलँड स्टारबक्ससाठी दररोज साडेतेरा हजार गॅलन दूध देत असे. आता हेच प्रमाण तीन दिवसांसाठी साडेचार हजार गॅलन झाले आहे. मागणी कमी, दूध साठवण्यास जागाही नाही. अशा परिस्थितीत दूध फेकून देण्याशिवाय अन्य पर्याय नाही. 

चिकनलाही मागणी नाही. परिणामी पोल्ट्रीतील कोंबड्यांची संख्या वाढत आहे. न विकलेली अंडी फोडली जात आहेत. काहींनी फुकट जाणारे चिकन स्वयंसेवी संस्थांना नेऊन दिले, पण त्यालाही मर्यादा आहे. 

शेतीचे हे नेहमीचेच दुखणे. सार्वत्रिक. पिकवलेला शेतमाल विकलाच जात नसल्याने एकंदरच शेती बुडत चालली आहे. या मालावर प्रक्रिया करण्याचा, तो वाहून नेण्याचा खर्च परवडत नाही. तशात निर्यात थांबलेली. काही देशांत थोडा फार माल जातो, पण डॉलरमधील चढऊतार नडतो. त्यामुळे त्या निर्यातीतूनही नफा होईल याची खात्री नाही. कोरोनामुळे नोकऱ्या जात आहे. प्रत्येकाने खर्च कमी केले आहेत. त्याचा खरेदीवर परिणाम झाला आहे. 

ही परिस्थिती कधी बदलणार हा प्रश्नच आहे. उद्याच्या दिवसावर आशा असते, पण तो जास्तच प्रश्न घेऊन उगवत आहे. पण तरीही शेतकऱ्यांनी आशा सोडलेली नाही. कोरोनामुळे कोसळलेली अर्थव्यवस्था काही दिवसांत रुळांवर येईल आणि पुन्हा शेतमालास भाव येईल ही त्यांची आशा आहे. 

--------------------------------

जपानमधील अबेनोमास्क

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा लांबवण्याचा निर्णय होईपर्यंत जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी कोरोनाचे आक्रमण रोखण्याचे उपाय लांबवले अशी टीका सुरु झाली आहे. त्या टिकेची तीव्रता कमी करण्यासाठी शिंझो अबे यांनी घरटी दोन मास्क पुरवण्याची योजना आखली. ही योजना अमलात आणण्यासाठी तब्बल 46 अब्ज 60 कोटी येनचा खर्च येईल असा अंदाज आहे. या योजनेसाठी खास तरतूद करण्यात येईल, असे सांगण्यात आले, मात्र नेमकी कधी पूर्ण होईल हे कोणीच सांगत नाही. कोरोनाची साथ कमी प्रमाणात असतानाच मास्कचा तुटवडा पडू नये म्हणून खास मास्क टीम तयार करण्यात आली होती. तरीही चणचण भासतच आहे. 

देशातील पाच कोटी घरांत प्रत्येकी दोन मास्क देण्याची ही योजना. म्हणजे दहा कोटी मास्क पुरवावे लागतील. पण ते मास्क काही कायमचे टिकणार नाहीत. जपान सरकार सांगते, हे एक मास्क धुवून वीस वेळा वापरला, तर एकदाच वापर करता येणारे - सिंगल यूज असे - दोन अब्ज मास्क वाचतील. हे सारेच हास्यास्पदतेच्या पातळीवर आले आहे. अबे यांच्या आर्थिक धोरणास अबेनॉमिक्स म्हटले जाते. याच धर्तीवर समाजमाध्यमांवर आता अबेनोमास्क हा हॅशटॅग पसरला आहे. त्याचे मीम्स व्हायरल होत आहेत. अशाच एका मीम मध्ये तोंड आणि नाक झाकणा-या मास्कबरोबरच डोळेही झाकणारा मास्क दाखविण्यात आला आहे. सगळ्यात लोकप्रिय झाला तो सात जणांचे कुटुंब एकाच वेळी दोन मास्कचा वापर करण्यासाठी करीत असलेले प्रयत्न दाखविणारे मीम. एकंदरीत कोरोनाच्या या आक्रमणात अबेनोमास्क जपानवासीयांसाठी एक टिंगलीचा विषय झाला आहे. 

---------------------------------------

उद्याने बंद, सुपरमार्केट सुरु!

ऑस्ट्रेलियात सामाजिक दूरस्थतेचा एक वेगळाच प्रकार दिसतो. तेथील न्यू साऊथ वेल्स प्रांतात उद्यानांमध्ये जाण्यास नागरिकांना बंदी करण्यात आली आहे. तेथे जाणा-यांना पोलिस अडवत आहेत. पण त्याच वेळी तेथील सुपर मार्केट मात्र सुरू ठेवण्यात आली आहेत. आणि तेथे सर्वांना मुक्त प्रवेश दिला जात आहे. उद्यानांत जाण्यावर बंदी का, याचे कारण देताना तेथील प्रशासन सांगते, की एकाला लागण झाली असेल तर त्याच्या संपर्कात येणा-

या दहा हजार जणांना त्याची लागण होते. उद्याने, खुल्या जागांवर लोकांनी गर्दी करु नये यासाठी पोलिस गस्त घालत आहेत. पण आता याविरोधात तेथील नागरिक वृत्तपत्रांतून आवाज उठवू लागले आहेत. सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये जोसेफा ग्रीन या वाचकाने लिहिले आहे, की लोक उद्यानांत एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसू शकतात. त्यांनी गर्दी केली तर त्यांना रोखता येईल. दंड करता येईल. लोकांना घरांतच थांबण्यास सांगितले आहे, पण त्यांना शांतता हवी असते. शहरांत अनेक मोकळ्या जागा आहेत. तेथे त्यांना प्रवेश दिला तर गर्दी होणार नाही. पण प्रशासन हे अनेकदा मेंदू बंद ठेवून निर्णय घेत असते. जेथे हातोड्याचे काम असते, तेथे घण वापरत असते. ऑस्ट्रेलियात हेच दिसते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com