
बुधवारी (ता. 25) रात्री साडेदहाच्या सुमारास आटगाव रेल्वेस्थानकात दोन पुरुष महिला डब्यात घुसलेच कसे? पुरेशी सुरक्षा व्यवस्था असती, तर "ती' दुर्दैवी घटना घडली नसती. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या सुरक्षा बल तसेच रेल्वे पोलिसांवर कारवाई करत महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी के-3 प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.
कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील आणि परवानगीप्राप्त नागरिकांनाच लोकल प्रवास करण्यास मुभा आहे; मात्र बुधवारी (ता. 25) रात्री साडेदहाच्या सुमारास आटगाव रेल्वेस्थानकात दोन पुरुष महिला डब्यात घुसलेच कसे? पुरेशी सुरक्षा व्यवस्था असती, तर "ती' दुर्दैवी घटना घडली नसती. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या सुरक्षा बल तसेच रेल्वे पोलिसांवर कारवाई करत महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी के-3 प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली आहे.
बुधवारी (ता. 25) कसारा लोकलमध्ये एका 21 वर्षीय तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली असली, तरी रेल्वे प्रशासन जागे होणार की नाही? महिला डब्यात पुरेशी सुरक्षा व्यवस्था द्यावी, अलार्म बटन लावावे, तसेच महिला डब्यांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे. सध्या कोरोनामुळे मर्यादित लोकांनाच लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे. इतर प्रवाशांनी स्थानकांवर येऊ नये म्हणून रेल्वे पोलिस आणि सुरक्षा बलावर जबाबदारी सोपवली आहे; मात्र कल्याण ते कसारा स्थानकादरम्यान पोलिस कर्मचारी नसल्याने लोकलमध्ये कोणीही प्रवास करत असल्याचा आरोप के-3 प्रवासी संघटनेचे सचिव श्याम उबाळे यांनी केला आहे.
42 कर्मचाऱ्यांची नेमणूक
या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी महिला डब्यात सुरक्षा दिली जात होती; मात्र अपुरे मनुष्यबळ आणि निधी नसल्याने मोहीम थांबवली होती. आता पुन्हा महिला डब्यात सुरक्षा व्यवस्था दिली असून रात्री आणि पहाटे 42 कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती रेल्वेचे पोलिस उपायुक्त एम. एम. मकानदार यांनी दिली.
----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)