नागरी सुविधा केंद्रातील नव्या नोटा कुठे गेल्या?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई - पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात विविध देयकांपोटी अनेक नागरिकांनी नव्या नोटा जमा केल्या. मात्र त्या बॅंकेत भरल्या गेल्या नाहीत. मग त्या कुठे गेल्या? नोटांची अदलाबदल कोणी केली, असा सवाल बुधवारी (ता. 21) स्थायी समितीच्या बैठकीत मनसेच्या सदस्यांनी केला. नोटा बदलून देणाऱ्या नागरी सुविधा केंद्रातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 8 नोव्हेंबरला 500 व एक हजारची नोटबंदी जाहीर केली. त्यानंतर नागरी सुविधा केंद्रात काही दिवस जुन्या नोटा भरण्याची सवलत दिली. त्यामुळे नागरिकांनी 500 आणि हजारच्या नोटा देयकापोटी जमा केल्या. अनेकांनी नव्या नोटाही जमा केल्या. नागरी सुविधा केंद्रात जमा झालेल्या नोटा बॅंकांमध्ये भरल्या जातात. मात्र, बॅंकेत भरताना दोन हजारांच्या नव्या नोटांची नोंद नाही. ही बाब बुधवारी हरकतीच्या मुद्द्याद्वारे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणली. नागरी सुविधा केंद्रात भरलेल्या नव्या नोटा कुठे गेल्या, असा सवाल त्यांनी केला. नागरी सुविधा केंद्रातून बॅंकेत भरलेल्या पावत्या त्यांनी स्थायी समितीत दाखविल्या. त्यामुळे प्रशासनाची मोठी अडचण झाली. पालिकेचे अधिकारी नोटबंदीचा फायदा घेऊन बेकायदा नोटा बदली करून देत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची दखल स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी घेतली. ही गंभीर बाब असून त्याची चौकशी होईपर्यंत हा मुद्दा राखून ठेवण्याचा निर्णय त्यांनी बैठकीत घेतला.

Web Title: where are going new currency in nagari suvidha kendra