उल्हासनगर पालिकेने केरळसाठी तयार केलेल्या चेकवरील व्हाईटनर व्हायरल

दिनेश गोगी
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मात्र त्यासाठी तयार केलेल्या चेकवर चक्क एका आकड्यावर व्हाईटनर लावण्यात आल्याचा प्रकार व्हायरल होताच, आज झालेल्या चुकीची दुरुस्ती करून नव्याने चेक तयार करून तो केरळसाठी रवाना करण्यात आला आहे.

उल्हासनगर - महाभयंकर महापूरामुळे केरळमध्ये जीवित व वित्त हाणी झाली असून लाखों नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.त्याअनुषंगाने सर्वत्र मदतीचा ओघ सुरू असून काल सायंकाळी उल्हासनगर महानगरपालिकातील अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार व  नगरसेवक-नगरसेविकांनी त्यांचे महिन्याचे मानधन मिळून केरळला सुमारे पावणे नऊ लाख रुपयांचा मदतीचा हात दिला आहे.

मात्र त्यासाठी तयार केलेल्या चेकवर चक्क एका आकड्यावर व्हाईटनर लावण्यात आल्याचा प्रकार व्हायरल होताच, आज झालेल्या चुकीची दुरुस्ती करून नव्याने चेक तयार करून तो केरळसाठी रवाना करण्यात आला आहे.
केरळवर उदभवलेल्या संकटाला पालिकेच्या वतीने मदतीचा हात देण्याचा निर्णय झाल्यावर वर्ग 1 व 2 चे अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त यांचा एक दिवसाचा पगार आणि नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन मिळून 8 लाख 74 हजार 813 रुपयांचा चेक तयार केला.

विशेष म्हणजे चेकवर मुख्यलेखाधिकारी व उपायुक्त मुख्यालय या दोन अधिकाऱ्यांच्या असाव्या लागतात. मात्र त्यावर केवळ मुख्यलेखाधिकारी यांचीच सही होती. उपायुक्त मुख्यालय यांची सही नव्हती. ही एक चूक आणि दुसऱ्या चुकीचा कहर म्हणजे 1 या आकड्यावर चक्क व्हाईटनर लावण्यात आले होते. महापौर मीना आयलानी, मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण, सभागृह नेते जमनादास पुरस्वानी,विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, सभापती मीना सोंडे, नगरसेवक किशोर वनवारी, मनोज लासी, प्रदिप रामचंदानी आदिंच्या उपस्थित हा चेक झळकवण्यात आला. उल्हासनगरातील असंख्य मासमीडियावर हा चेक व्हायरल झाल्यावर त्यावरील व्हाईटनर व एकच सही चा प्रकार चव्हाट्यावर आला.

आज सकाळी उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर यांनी कालचा चेक रद्दबाबत करताना नव्याने दोन सह्यानिशीचा आणि व्हाईटनर नसणारा चेक तयार करून तो केरळसाठी रवाना केला.

दरम्यान उल्हासनगरातून मदतीचा ओघ सुरूच असून सेवानिवृत्त जिल्हाधिकारी कमलेश सोनाले-अजिता सोनाले या दाम्पत्याने पाच हजार रुपये, धान्य-कपडे अशी मदत केली आहे. डिवायएफआय या संस्थेच्या वतीने ज्योती तायडे यांनी केरळी बांधवांच्या उपस्थितीत शहरामधून दोन लाख रुपयांचे धनादेश, दोन ट्रक धान्य-कपडे जमा केले असून ज्योती तायडे ह्या स्वतः केरळला जाऊन त्याचे वाटप करणार आहेत.

शिवसैनिक सागर उटवाल हे देखील केरळला मदतीचा हात देण्यासाठी दुकानात जात असून त्यांनी देखील धान्य कपडे जमा केले असून ते केरळला पाठवण्यात येणार आहेत. टीम ओमी कलानीच्या वतीने उल्हासनगरातील सर्व बाजारपेठेत रॅली काढण्यात येणार आहे. कपडे, चादरी, ब्लॅंकेट, बिस्किटे, पाणी देण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात येणार असून ते केरळला जाऊन तेथील नागरिकांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ओमी कलानी यांनी दिली.

Web Title: whitener viral on check made by Ulhasnagar Municipal Corporation for Kerala