‘आरे’तील आग कोणी लावली?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई - गोरेगावमधील आरे वसाहतीमधील जंगलाला लागलेल्या आगीतून आता संशयाचा धूर उठण्यास सुरवात झाली आहे. कारण, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीच याबाबत संशय व्यक्त केला आहे. ‘आरे’तील जंगलाला आग लागली, की लावली याबाबत वन विभागाने तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. तसेच या आगीसंदर्भात आपण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

आरे कॉलनीतील जंगलाला सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता लागलेली भीषण आग तब्बल सहा तासांनी आटोक्‍यात आली.  अग्निशामक दलाच्या जवळपास १०० जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री साडेबाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले आहे. डोंगराळ भाग असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या तिथे पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांनी पायी जाऊन आग विझवली. मात्र, या आगीमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप वनशक्ती या संस्थेने केला आहे. आरे कॉलनीतील जमीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून ही आग लावल्याचा आरोप होत आहे. 

दरम्यान, या आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे सहायक मनपा आयुक्त संजोग कबरे यांनी सांगितले. आरोपांमध्ये तथ्य असेल तर दोषींविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिली.

आता खुद्द रामदास कदम यांनीच आगीबद्दल संशय व्यक्त केला आहे. यामागे कुणाचा वेगळा हेतू असेल तर त्याची पानेमुळे खोदून काढणार असल्याचा इशाराही कदम यांनी दिला आहे.

Web Title: Who put the fire of Aarey asked ramdas kadam