रायगड जिल्ह्यात राजकीय वादळ? 

महेंद्र दुसार
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

रायगड जिल्हा परिषदेतील 59 सदस्य संख्या असून शेकापचे 23 आणि शिवसेनेचे 18 सदस्य आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी शेकाप शिवसेनेशी युती करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करू शकते. कार्यकर्त्यांमध्ये या चर्चेला सध्या उधाण आले आहे. दरम्यान, निवडणुकीचे निकाल आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने न लागल्याने खदखद आहे. ती स्फोटक होण्याची शक्‍यता आहे. 

अलिबाग : विधानसभा निवडणूक निकालानंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप आघाडीतील संबंधावर झाला आहे. याची पहिली झलक जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवर होण्याची शक्‍यता आहे. भविष्यात हे राजकीय वादळ वेगळे वळण घेण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. 

रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप आघाडीची सत्ता आहे. ही आघाडी विधानसभा निवडणुकीतही एकत्र लढली; मात्र आघाडीच्या उमेदवारास दगाफटका झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान शेकापचे सदस्य कोणती भूमिका घेतात, याकडे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषद आपल्या ताब्यात राहावी, यासाठी शेतकरी कामगार पक्ष नेहमीच जिवाचे रान करत आला आहे. यासाठी कधी शिवसेनेशी हातमिळवणी, तर कधी राष्ट्रवादीशी जवळीस साधून या पक्षाने जिल्हा सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे. 

जिल्हा परिषदेतील 59 सदस्य संख्या असून शेकापचे 23 आणि शिवसेनेचे 18 सदस्य आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी शेकाप शिवसेनेशी युती करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करू शकते. कार्यकर्त्यांमध्ये या चर्चेला सध्या उधाण आले आहे. दरम्यान, निवडणुकीचे निकाल आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने न लागल्याने खदखद आहे. ती स्फोटक होण्याची शक्‍यता आहे. 

आदिती तटकरे देणार राजीनामा 
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आदिती तटकरे या श्रीवर्धन मतदारसंघात विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या वरसे गणाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या वरसे गणासाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. 

कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष हा शेकापचाच होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी जे ठरलेले आहे, त्याचे कोणत्याही परिस्थितीत पालन केले जाईल. 
- सुनील तटकरे, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

अध्यक्षपदाच्या निवडीला वेळ आहे. त्यामुळे आताच काही भाष्य करणे चुकीचे ठरेल. त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी घेतील. 
- सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना विरोधी पक्षनेते, रायगड जिल्हा परिषद 

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल 
शेकाप 23 
राष्ट्रवादी कॉंग्रेस 12 
शिवसेना 18 
कॉंग्रेस 3 
भाजप 3 

एकूण - 59 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who will new president of raiagd zp