दिव्यात कोणाचा उजेड पडणार? 

दिव्यात कोणाचा उजेड पडणार? 

डोंबिवली - ठाणे पालिका निवडणुकीत दिव्यातल्या नगरसेवकांची संख्या दोनवरून 11 झाल्याची घोषणा होताच राजकीय पक्षांनी दिव्यात आपल्याच पक्षाचा लखलखाट झाला पाहिजे, असे ठरवून तिथल्या वाऱ्या सुरू केल्या. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्येच खरी लढत असल्याचे बोलले जात असताना अचानक डम्पिंग ग्राऊंडचा मुद्दा उचलून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आणि आपणही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे येथे प्रामुख्याने मनसे, भाजप आणि शिवसेना या पक्षात तिरंगी लढत होणार आहे. यंदा पालिकेच्या निवडणुकीत केंद्रस्थानी ठरलेल्या दिव्यात कोणत्या पक्षाचा उजेड पडतो हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

दिव्यात प्रामुख्याने शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. भाजपनेही अडीच वर्षात येथे बऱ्यापैकी आपले अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे. मात्र गत निवडणुकीत दिव्यातल्या नागरिकांनी मनसेच्या बाजूने कौल दिला. नगरसेवकपदाचा उपभोग घेऊन झाल्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या दोनही नगरसेवकांनी हाती धनुष्यबाण घेत शिवसेनेत प्रवेश केला. यंदा 11 नगरसेवक येथून निवडून जाणार असल्याने सत्तेची समीकरणे बदलली आहेत. दिव्यातल्या नागरिकांचे एक मतही उमेदवाराला तारक किंवा मारक ठरू शकते, याची जाण राजकीय पक्षांना झाली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील भाजप, शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी काही दिवस दिव्यातच तळ ठोकून आहेत; तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची या ठिकाणी वाताहत झाली असून या पक्षांनी मुंब्रा आणि कळव्यातच आपले लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. 

नगरसेवकांची संख्या वाढल्याने राजकीय पक्षांच्या तोंडाला पाणी सुटले. भाजपने तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच प्रचाराच्या रिंगणात उतरवले. अडीच वर्षात एमएमआरडीच्या माध्यमातून दिव्यातले एकही विकासकाम झाले नसताना, मुख्यमंत्र्यांनी अचानक एमएमआरडीएच्या माध्यमातून दिव्याला दत्तक घेणार असल्याची घोषणा केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत शिवसेना आणि भाजपवर बोचरी टीका केली. इतकेच नाही; तर शिवसेनेला मैदान उपलब्ध होऊ नये यासाठी मनसेने "दिवा महोत्सव मैदान' 9 ते 19 फेब्रुवारीपर्यंत रीतसर परवानगी घेऊन ताब्यात ठेवले होते. मात्र मनसेने मुख्यमंत्र्यांच्या सभेला मैदान देऊन आपली खरी लढाई ही शिवसेनेशीच असल्याचे दाखवून दिले. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजपवर खरमरीत टीका केली. त्यामुळे शिंदे, फडणवीस आणि ठाकरे यापैकी दिव्यातले मतदार कोणाला साथ देतात, हे लवकर समजणार आहे. 

संख्या वाढल्याने दिव्याला महत्त्व 
भाजप, शिवसेनेसोबत मनसे आक्रमक 
11 नगरसेवकांमुळे सत्तेची समीकरणे बदलली 
दिव्यात प्रत्येक मत ठरणार महत्त्वाचे 
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाताहत 
मातब्बर नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com