ठाण्यातील "या' फेरीवाल्यांना कोणाचा वरदहस्त? 

ठाण्यातील "या' फेरीवाल्यांना कोणाचा वरदहस्त? 

ठाणे : शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पालिकेच्यावतीने गेले काही दिवस सातत्याने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. स्थानक परिसरातील फेरीवालेही हटविण्यात आल्याचे दिसून येत असले तरी "दादा पाटील वाडी'लगतच्या चिंचोळ्या रस्त्यावर असलेल्या काही मोजक्‍या फेरीवाल्यांना मात्र अधिकाऱ्यांनी "हात'ही लावला नसल्याचे दिसून येत आहे. "पदपथ आम्ही अडवला नसल्याने आमच्यावर कारवाई होत नाही', असे मोठ्या थाटात हे फेरीवाले सांगत असले तरी रस्त्यावरच ठाण मांडणाऱ्या या फेरीवाल्यांना नक्की कोणाचे अभय आहे? असा सवाल नागरिक करीत आहेत. 

शहरातील पदपथ किमान पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे ठेवावेत, असे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सहायक आयुक्तांना दिल्यानंतर प्रत्येक प्रभागातील अधिकाऱ्यांनी स्वतः जातीने उपस्थित रहात आपापल्या प्रभागातील पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. सलग तीन-चार दिवस चाललेल्या या कारवाईमुळे पदपथ मोकळे झाले खरे; परंतु तेही काही कालावधीपुरतेच.

ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील सॅटीसखालील पदपथांवर फेरीवाले मोठ्या प्रमाणात बस्तान मांडून असतात. गेले काही दिवस येथील फेरीवाले हटल्याचे दिसत आहे. असे असले तरी दादा पाटील वाडीकडे जाणाऱ्या चिंचोळ्या रस्त्यावरील काही मोजक्‍या फेरीवाल्यांवर मात्र अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचे दिसून येते. 

यात फळ, इडली-डोसा विक्रेता, मोबाईल इअर फोन, चहा तसेच सिगारेट विक्रेत्यांचा समावेश आहे. अधिकारी या परिसरात येत असले तरी या विक्रेत्यांवर कारवाई न करताच निघून जातात. त्यानंतरही दोन दिवस पहाणी केली असता इतर फेरीवाले हटले; परंतु सॅटिस पुलाला लागून असलेल्या फेरीवाल्यांनी मात्र याठिकाणी कायमचे बस्तान मांडल्याचे दिसून येते.

वास्तविक रेल्वेस्थानकातून बाहेर पडण्यासाठीचा हा एक मार्ग असून हा रस्ता अडवूनच हे विक्रेते बस्तान बांधून असतात. अधिकाऱ्यांची कारवाईसाठी फेरी मारण्याची वेळ या विक्रेत्यांना माहिती असून त्या दरम्यान फेरीवाले गायब होतात. अधिकारी जाताच पुन्हा येथे आपले बस्तान मांडतात. या फेरीवाल्यांना नक्की कोणाचे अभय आहे, असा सवाल नागरिक करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिका प्रशासनाचे कर्मचारी आले; परंतु फळ विक्रेता व इतर ठराविक विक्रेत्यांना अधिकाऱ्यांनी हटविले नाही. इतर फेरीवाल्यांचा माल त्यांनी उचलला. आताही इतर फेरीवाले या परिसरात दिसत नाही; परंतु हे ठराविक विक्रेते येथेच आहेत. त्यांच्यावर का कारवाई होत नाही? 
सुजाता नवले, नागरिक 

सॅटिसखाली सिगारेट विक्रेत्यांचे स्टॉल्स असून, धुम्रपान करणाऱ्यांनी येथे अड्डाच बनविला आहे. सकाळ-संध्याकाळ जास्त प्रमाणात येथे नागरिक असल्याने धुराचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई असतानाही या नियमाचे येथे उल्लंघन होते. 
राहुल देसाई, नागरिक  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com