मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई का...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

हौसेपोटी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दादा, नाना, आबा, राज अशा फॅन्सी मराठी नंबर प्लेट लावले जातात.

मुंबई : महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमनुसार, मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेशच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नियम नसतानाही वाहतूक पोलिसांनी गेल्या 14 महिन्यांत सुमारे 667 दुचाकी वाहनांवर कारवाई करत तब्बल 17 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यात मराठी नंबर असलेल्या किती चारचाकी वाहनांवर कारवाई केली आहे, याचा तपशील मात्र वाहतूक विभागाकडे उपलब्ध नाही.

- आता ‘इस्रो’च्या सगळ्या मोहिमा यशस्वी होणार? मिळाला ‘छप्पन्नभोग’ नैवेद्य!

हौसेपोटी अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दादा, नाना, आबा, राज अशा फॅन्सी मराठी नंबर प्लेट लावले जातात. मुंबई वाहतूक पोलिसांकडून मराठी नंबर प्लेट असलेल्या वाहनांकडून दंड वसूल करतेवेळी मात्र, दुजाभाव करण्यात येत असल्याचा धक्कादायक तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गोवर्धन देशमुख यांनी माहिती अधिकारात वाहतूक विभागाकडे मराठी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे राज्य शासनाचे आदेश असलेली प्रत मागिवली होती. याबाबतचा आदेश नसल्याचे उत्तर त्यांना सरकारने पाठविले आहे.

राज्यातील मराठी क्रमांक असणाऱ्या वाहनांवर केंद्र सरकारच्या मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई चुकीचे असल्याचे मत गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केले. 1988-89 मध्ये जो कायदा बनवण्यात आला, त्यातील कलम 50 नुसार वाहतूक पोलीस देत आहेत. मात्र, यात दंडाची रक्कम नमूद नाही. मग कोणत्या तरतुदीनुसार पोलीस 200 रुपये आकारतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

- सांगलीसह चार जिल्ह्यातून ३१ दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

सरकार जोपर्यंत मराठी क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश देत नाही, तो पर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई करू नये, अशी मागणी मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर सतत होत असलेल्या कारवाईला आळा घातला पाहिजे, तसे पत्र संघटनेमार्फत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना देण्यात आले आहे. शिवाय राज्यात वाहनांवर मराठी क्रमांक टाकण्यास अधिकृत परवानगी शासनाने द्यावी, अशीही मागणी पत्रात केली आहे.

1 एप्रिल 2018 ते 31 मे 2019 या 14 महिन्यात वाहतूक पोलिसांकडून 667 दुचाकी वाहनांवर कारवाई केली गेली आणि 17 हजार 200 रुपये दंड वसूल केला गेला. राज्य सरकारने जर दंड आकारण्याचे आदेशच दिले नाहीत, मग केंद्र सरकारची तरतूद मान्य करायची की नाही? हा निर्णय राज्य शासनाला घेऊ द्या. राज्याचे स्वतःचे हक्क आहेत की नाही काही? सध्या यावर राज्य शासनाने कोणतेही आदेश दिलेले नसताना देखील वाहतूक पोलीस मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर अनधिकृतरित्या कारवाई करत आहे.
- गोवर्धन देशमुख, कार्यकर्ता, महाराष्ट्र एकीकरण समिती

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर दर्शनासाठी खुले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why action on vehicles with number in Marathi