नाणी, नोटांचा आकार सतत का बदलतो? : उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

रिझर्व्ह बॅंक सतत नाणी आणि नोटांचा आकार का बदलत असते, अशी विचारणा गुरुवारी (ता. १) मुंबई उच्च न्यायालयाने केली.

मुंबई : रिझर्व्ह बॅंक सतत नाणी आणि नोटांचा आकार का बदलत असते, अशी विचारणा गुरुवारी (ता. १) मुंबई उच्च न्यायालयाने केली. अन्य कोणत्याही देशात अशा प्रकारचे बदल सतत केले जात नाहीत, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.

नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) या संस्थेच्या वतीने ॲड्‌. उदय वारुंजीकर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. चलन आणि नाण्यांची ओळख स्पर्शाने अंध व्यक्तींना व्हावी यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सुलभ यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी नॅबने केली आहे, परंतु रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा काही नोटांचा आकार व अन्य वैशिष्ट्ये बदलली आहेत, असे खंडपीठाला सांगण्यात आले. रिझर्व्ह बॅंक अशा प्रकारे चलनाचा आकार आणि वैशिष्ट्ये सतत का बदलते, अशी विचारणा खंडपीठाने केली. परदेशांतही चलनात अशा प्रकारे बदल होत नाहीत, असे खंडपीठाने निदर्शनास आणून दिले. दृष्टिहिनांना सोईस्कर व्हावे म्हणून काही नाणी आणि नोटांमध्ये मार्चमध्ये बदल केले आहेत, असे रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत सहा आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बॅंकेला दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why currency size changes regularly?