esakal | गुजरातला ३० लाख तर महाराष्ट्राला फक्त साडेसात लाख लसीच का?
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh.jpg

राजेश टोपेंनी दाखवून दिला लस वितरणातील भेदभाव.

गुजरातला ३० लाख तर महाराष्ट्राला फक्त साडेसात लाख लसीच का?

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लस वितरणामध्ये महाराष्ट्राबरोबर दुजाभाव का केला जातोय? असा सवाल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. केंद्र सरकारकडून लस वितरणात राज्यांमध्ये कशा पद्धतीने दुजाभाव केला जातोय, ते आकडेवारीनिशी मांडले. महाराष्ट्राला फक्त ७.५० लाख लसी देण्यात आल्या आहेत. तेच उत्तर प्रदेशला ४८ लाख, हरियाणाला २४ लाख आणि गुजरातला ३० लाख लसी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

"महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. सक्रीय रुग्णसंख्या ४.५० लाख आहे. ५७ हजार मृत्यू झाले आहेत. बाधित रुग्णांची संख्या ३० लाखाच्या घरात आहे. पॉझिटिव्हीटी रेट २० ते २५ टक्के असताना, आम्हाला फक्त साडेसात लाख लसी कशा दिल्या?" असा सवाल राजेश टोपे यांनी विचारला आहे. 

"मी लगेचच या बद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी फोनवरुन बोललो. त्यांनी मला विश्वास दिलाय की, महाराष्ट्राला लसीची कमतरता पडू देणार नाही. अधिकाऱ्यांशी बोलून ते आवश्यक सूचना देतील असे त्यांनी मला सांगितले आहे" असे राजेश टोपे म्हणाले. "महाराष्ट्राला सात दिवसाला ४० लाख लसींची आवश्यकता आहे. महाराष्ट्राला महिन्याला १ कोटी ६० लसीच्या डोसची आवश्यकता आहे, तरच आवश्यक गती राखली जाईल. लसी नसल्यामुळे सातारा, सांगली आणि पनवेल येथे लसीकरण बंद आहे" असे टोपे म्हणाले.  

बरोबर २८ दिवसांनी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला लसीचा दुसरा डोस

महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांची संख्या जास्त असताना फक्त ७.५० लाख लसी  आणि अन्य राज्यांना ३० ते ४० लाख लसी या भेदभावाकडे त्यांनी लक्ष वेधले.  लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. आम्ही लसीकरण दिवसाला सहा लाखाच्या पुढे वाढवणार नाही असे त्यांनी सांगितले.  

'वास्तव नाकारुन चालणार नाही', शरद पवारांनी महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

"बाहेर देशांमध्ये लस पाठवण्याऐवजी आज आपल्या राज्याला गरज आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव राजमार्ग आहे, तरच हर्ड इम्युनिटी आणता येईल" असे त्यांनी सांगितले. "अमेरिकेने १८ वर्षापुढील  वयोगटासाठी लसीकरण सुरु केलय. १८ ते ४५ हा सर्वात जास्त बाहेर फिरणारा वयोगट आहे आणि हाच वयोगट इतरांना इन्फेक्ट करतो. त्यामुळे १८ वर्षापुढील वयोगटासाठी लसीकरण सुरु करण्याची त्यांनी मागणी केली.   गुजरातची लोकसंख्या ६ कोटी आतापर्यंत  त्यांना लसीचे १ कोटी डोस दिले. मग महाराष्ट्राची लोकसंख्या गुजरातच्या दुप्पट १२ कोटी असताना फक्त १ कोटी ४ लाख लसीचे डोस दिले आहेत" याकडे राजेश टोपे यांनी लक्ष वेधले. 
 

loading image