आरक्षणविरोधी कंगनाला पाठींबा का? आठवलेंच्या भूमिकेवर रिपाई नेत्याने दिला राजीनामा

विनोद राऊत
Friday, 11 September 2020

कंगना रनौत प्रकरणात रामदास आठवले यांनी घेतलेल्या भूमिकेवर आंबेडकरी चळवळीतील  नेत्यांनी सडकून टिका केली आहे.

मुंबई : कंगना रनौत प्रकरणात रामदास आठवले यांनी घेतलेल्या भूमिकेवर आंबेडकरी चळवळीतील  नेत्यांनी सडकून टिका केली आहे. रामदास आठवले यांच्या पक्षातही या मुद्द्यावरुन धुसफूस सुरु आहे. कंगनाचा आरक्षणविरोध जगजाहिर असताना तिच्यासाठी एवढी आदळआपट करण्याची गरज काय होती. मुंबईत कागदपत्रे असतानाही  झोपडपट्टीत राहणाऱ्यांच्या घरावर हातोडा चालतो, त्याचे काय ? अशे अनेक प्रश्न खुद आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. या कृतीच्या निषेधार्थ पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षांनी राजीनामाही दिला आहे. 

कंगनाला नुकसान भरपाई मिळावी; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

अभिनेत्री कंगना रणौतने आरक्षणासंदर्भात 23 ऑगस्टला एक वादग्रस्त ट्विट केले होत. यामध्ये आधुनिक भारतीयांनी जातव्यवस्था नाकारली आहे. केवळ संविधानाने आरक्षणाच्या रुपात  जातव्यवस्था अबाधित ठेवली आहे, असे तिने म्हटले होते. त्यामुळे राज्यघटनेला आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्या कंगना रनौतची भूमिका आठवलेंना मान्य आहे का? असा सवाल ज्येष्ठ रिपब्लिकन नेते  जोगेंद्र कवाडे यांनी विचारला आहे. राज्यात दलितांवरील अत्याचारापासून अनेक प्रश्न असतांना, रनौतसारख्या नटीचा उदोउदो करण्याची गरज काय? याचे उत्तरही आठवलेंनी द्यावे, असही कवाडे म्हणाले. 
बॉलीवूडमध्येच कंगनाला कुणी गंभीरतेने घेत नाही. खरे तर सत्ताधारी आणि विरोधकांनी कंगनाकडे दुर्लक्ष करायला हवे होते. कंगनाला भेटायचीही गरज नव्हती. मात्र तिला अवाजवी महत्व दिल गेले, अशी भूमिका रिपाई नेते राजेंद्र गवई यांनी मांडली. 
रामदास आठवले यांनी राजकीय युतीसोबतच भाजपशी तात्त्विक समझौताही केला का? असा सवाल एकेकाळचे आठवलेंचे कट्टर समर्थक असलेले साहित्यिक आणि रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी केला आहे. मुळात कंगनाच्या कार्यालयाचे पाडकाम प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यामध्ये  पडण्याची आठवलेंना गरज नव्हती. कंगनाने महाराष्ट्र, मुंबई पोलिस आणि आरक्षणाविरोधी भूमिका घेतली. त्याचा स्पष्ट शब्दात विरोध करायला पाहीजे, असेही डांगळे यांनी म्हटले. 

एक महिला म्हणून कंगनाला दिलेला पाठींबा मी समजू शकतो. मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्या, महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या महिलेला पाठींबा द्यायला नको होता, असे आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक ज वी पवार यांनी म्हटले आहे. रामदास आठवले  भाजपचे खासदार असल्यामुळे कंगनाला दिलेला पाठींबा हा त्यांचा राजकारणाचा भाग असावा. शेवटी आठवले आता भाजपचे प्रवक्ते असल्याचा टोलाही त्यांनी लावला आहे. 

ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज; शरद पवार यांची सूचक प्रतिक्रीया

पक्षातच धुसफुस 
आठवलेंची भूमिका पक्षातील अनेकांना रुचलेली नाही. मुंबईचा द्वेष करणाऱ्या नटीला साहेबांनी दिलेल्या पाठींब्याचे समर्थन कसे करायचे अशी गोची कार्यकर्त्यांची झाली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांची थेट आठवले यांना फोन करुन त्यांची नाराजी व्यक्त केली. अमरावती जिल्हा अध्यक्ष  प्रदीप दंदे यांनी एक खरमरीत पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला. आठवले तूम्ही मोदीधार्जीने झालात. आरक्षणाला विरोध करणाऱ्या विदुषीला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते तसेच केंद्रीय नेते असताना आपण स्वतःहून तिच्या घरी जाता, हे मला न पटणारे आहे. तूम्ही आपल्या नेतृत्वाची रया या निमित्ताने घालवली, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why support anti reservation stand kanganaranaut RPI