२७ वर्षाच्या प्रदीर्घ लढाई नंतर वीरपत्नीला न्याय

महेश पांचाळ (सरकारनामा न्यूज ब्यूरो)
सोमवार, 17 एप्रिल 2017

पुढील दोन आठवडयात हे प्रकरण निकाली काढून पेन्शनची रक्कम वीर पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या न्या. अनुप मोहता व न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने दिले.

मुंबई : दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला गेली 27 वर्षे शासकीय यंत्रणेकडून पेन्शनसाठी २७ वर्षे दारोदारी भटकायला लागल्यानंतर अंतिमतः वीर पत्नी पेन्शनसाठी पात्र ठरवावे असे आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील तुळसाबाई गणपती सूर्यवंशी या ७६ वर्षीय वृद्ध महिलेला १९९० साला पासून म्हणजेच गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य सरकार यांच्याकडे वीर जवानाच्या पत्नीला मिळणाऱ्या पेन्शनसाठी न्याय मागत होत्या. पुढील दोन आठवडयात हे प्रकरण निकाली काढून पेन्शनची रक्कम वीर पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या न्या. अनुप मोहता व न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने दिले. यामुळे वीर जवान पत्नीला मोठा दिलासा मिळाला आहे. 

तुळजाबाई यांचे पती गणपती सूर्यवंशी हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करात दाखल झाले होते. सूर्यवंशी कुटुंबिय हे कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील रहिवाशी होते. गणपती सूर्यवंशी यांचे 1985 साली निधन झाल्यानंतर 1990 साली श्रीमती तुळसाबाई मुलासह महाराष्ट्रातील शिरोळ गावी राहण्यास आल्या आणि कायमच्या रहिवासी झाल्या. 1990 सालानंतर दुसऱ्या महायुद्धात लष्करी सेवा केलेल्या सैनिकांच्या पत्नीसाठी पेन्शन योजना सुरु केली. त्यानंतर काही दिवसात तुळसाबाई यांनी राज्य सरकारकडे पेन्शन साठी अर्ज केला. सरकारने कर्नाटक राज्याचे रहिवाशी असल्याचे कारण देत त्यांचा अर्ज रद्दबातल केला होता. तुळसाबाई यांनी  कंटाळून अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून याचिका दाखल करत दाद मागितली. त्यावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. पुढील 2 आठवड्यात पेन्शन रक्कम विधवा पत्नीच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिल्याने सैनिक कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: wife of Ex-Serviceman got justice after 27 years