मैफलीनंतर उरल्या फक्त दारूच्या बाटल्या!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

नेरूळच्या डी. वाय पाटील स्टेडियमवर प्लॅस्टिकचाही खच
नवी मुंबई - पॉप स्टार जस्टिन बीबरच्या लाइव्ह कॉन्सर्टनंतर नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज सकाळी प्लॅस्टिक आणि विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे साम्राज्य पसरले होते. ते पाहिल्यावर कुबेरांच्या कुटुंबकबिल्यांनी तेथे किती धिंगाणा घातला असेल, याचा अंदाज यावा.

नेरूळच्या डी. वाय पाटील स्टेडियमवर प्लॅस्टिकचाही खच
नवी मुंबई - पॉप स्टार जस्टिन बीबरच्या लाइव्ह कॉन्सर्टनंतर नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज सकाळी प्लॅस्टिक आणि विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे साम्राज्य पसरले होते. ते पाहिल्यावर कुबेरांच्या कुटुंबकबिल्यांनी तेथे किती धिंगाणा घातला असेल, याचा अंदाज यावा.

स्टेडियमच्या परिसरातील दृश्‍य विदारक होते. मैदानाच्या कडेला, लॉबी व गॅलरीतील कचऱ्यात विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच होता. जस्टिनच्या सुरांवर थिरकताना किती दारू रिचवली गेली असेल, याची कल्पना त्यावरून येते. एकीकडे प्लॅस्टिकमुक्तीची एकमुखी हाकाटी सुरू असताना जस्टिनच्या कॉन्सर्टचे साक्षीदार झालेल्या बड्या बापांनी आणि त्यांच्या बेट्यांनी स्टेडियमवर इथे-तिथे प्लॅस्टिकच्या वस्तू फेकल्या होत्या. त्या उचलताना हातावर पोट असलेल्या सफाई कामगारांच्या हातांची दमछाक झाली. स्टेडियमच्या कडेचा स्टॅंड, पहिल्या माळ्यावरील लॉबी आणि काही व्हीआयपी रूममध्ये बाटल्यांचा खच पडला होता.

जस्टिनच्या भारतातील या पहिल्याच लाइव्ह कॉन्सर्टसाठी बॉलिवूडचे तारांगण अवतरले होते. राजकीय नेतेही वेळात वेळ काढून हजर होते. परराज्यांतून विशेषतः दिल्ली व बंगळूरहूनही उच्चभ्रू मंडळी आली होती. स्वच्छतेच्या बाबतीत ज्या नवी मुंबईने देशाच्या पश्‍चिम भागात पहिला क्रमांक पटकावला, त्याच शहरातील डी. वाय. पाटील स्टेडियमवरची आजची सकाळ अस्वच्छ आणि अस्वस्थ करणारी होती.

... त्यांचे झाले हाल
जस्टिनच्या कॉन्सर्टचा आनंद 40 हजार लोकांनी घेतला. त्यांचे मनोरंजन झाले; पण त्रास सोसला लाखो प्रवाशांनी. जस्टिनच्या चाहत्यांच्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती; पण वाटेल तेथे वाहने उभी करून "आपण किती बेशिस्त आहोत', हे अनेकांनी दाखवून दिले. कार्यक्रम संपल्यानंतर शहरात आलेली सुमारे 15 हजारांहून जास्त वाहने एकाच वेळी बाहेर पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्या. कोंडीत सापडलेल्या गाड्यांमधील लहान मुलांचे हाल झाले.

Web Title: wine bottle on d. y. patil stadium