बाटली बंदचा फटका मुंबईलाही

- मंगेश सौंदाळकर
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई उपनगरातील 276 दुकानांना टाळे, मागणी रोडावली

मुंबई उपनगरातील 276 दुकानांना टाळे, मागणी रोडावली
मुंबई - रस्ते अपघात रोखण्याकरता राज्य महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे मुंबईतील 276 मद्यविक्रीच्या दुकानांना कायमचे टाळे लागणार आहे. सर्वाधिक मद्यविक्रीची दुकाने ही उपनगरात आहेत; तर नोटाबंदीच्या फटक्‍यासह महामार्गावरील दुकाने बंद करण्यात येत असल्यामुळे स्टॉकिस्टने मद्यविक्रीच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. परिणामी नुकसान भरून काढण्याकरता मद्यउत्पादक कंपन्यांनी स्टॉकिस्टना खरेदीमागे "भेट वस्तू' देण्यावर काट मारण्याचे ठरवले आहे.

देशात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अपघात रोखण्याकरता महामार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महामार्गापासून मद्यविक्रीची दुकाने पाचशे मीटर लांब असावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात एकूण 5 हजार परमिट रूम आहेत; तर 4 हजार 272 देशी दारूची आणि दोन हजार बीअर शॉपी आहेत. या बाटली बंदचा फटका पुणे, ठाणेपाठोपाठ आता मुंबईलाही बसणार आहे. विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबई शहर आणि उपनगर मिळून दोन हजार 214 मद्यविक्रीची दुकाने आहेत. त्यापैकी उपनगरातील 276 दुकानांना आता टाळे लागणार आहे.

बहुतांश दुकाने ही पूर्व उपनगरातील आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार 2014 आणि 2015 मध्ये मुंबईत अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दीड टक्‍क्‍यांनी वाढले होते. राज्याचा विचार केला तर देशी दारूची राष्ट्रीय महामार्गावरील 17 टक्के, तर राज्य महामार्गावर 61 टक्के दुकाने बंद पडणार आहेत. वॉईन शॉपची 1700 दुकाने असून दोन्ही महामार्गावरील 831 बंद होणार आहेत. बीअर शॉपीची 56 टक्के दुकाने कायमची बंद होतील. 40 टक्के बीअर शॉपी या राज्य महामार्गावर आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणे आणि पुण्यालाही महामार्गावरील बाटली बंदचा चांगलाच फटका बसणार आहे.

भेट वस्तूवर काट
नोटाबंदी, स्थानिक कराचे ओझे आणि महामार्गावरील बाटली बंदमुळे मद्य उत्पादन कंपन्यांनी विक्रेत्यांना दिल्या जाणाऱ्या मोफतच्या भेट वस्तूंवर काट मारण्याचे ठरवले आहे. मद्यविक्रेत्यांनी नवीन खरेदीकडे पाठ फिरवल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. काही मद्य उत्पादन कंपन्यांनी जाहिरात आणि प्रमोशनवर जास्त पैसे खर्च न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Web Title: wine sailing ban highway