नोकरीचे प्रलोभन दाखवून फसविणाऱ्या महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

रेल्वे, जेएनपीटी व इतर सरकारी विभागांत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील जयश्री दाते या महिलेला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

नवी मुंबई : रेल्वे, जेएनपीटी व इतर सरकारी विभागांत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीतील जयश्री दाते या महिलेला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात या महिलेच्या पतीसह इतर चार जणांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. 

याप्रकरणी आतापर्यंत चौघांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या असल्या, तरी ही संख्या मोठी असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपी जयश्री दाते, तिचा पती सुनील दाते व त्यांचे सहकारी दीपक सिंग, मनीष सिंग व सादीक यांनी एपीएमसीतील मॅफ्को मार्केटमध्ये सुजय मल्टि सर्व्हिसेस प्रा. लि. नावाचे कार्यालय सुरू केले होते. त्या माध्यमातून त्यांनी कोलकाता येथे रेल्वे पोलिसांत नोकरीला लावण्याबाबत जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांनी या कार्यालयाशी संपर्क साधला. टोळीने प्रत्येकाकडून 4 ते 5 लाख रुपयांची रक्कम घेतली होती.

या टोळीने दिलेल्या नोकरीसंबंधीच्या कागदपत्रांबाबत शंका आल्याने तरुणांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी जयश्री दाते या महिलेला 11 जून रोजी अटक केली. पोलिसांनी इतर चौघांचा शोध सुरू केला आहे. 

Web Title: A women arrested fake promises for job