पहिल्या दिवशी लोकल ट्रेनमध्ये महिलांची तुरळक गर्दी; तिकीट, पास मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा

प्रशांत कांबळे
Wednesday, 21 October 2020

पहिल्याच दिवशी महिलांची रेल्वे स्थानकांवर आणि लोकलच्या डब्यांमध्ये तुरळक गर्दी पहायला मिळाली.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली लोकल सेवा बुधवारी महिलांसाठी सरसकट सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी महिलांची रेल्वे स्थानकांवर आणि लोकलच्या डब्यांमध्ये तुरळक गर्दी पहायला मिळाली. मात्र काही महिला प्रवासी कोरोनाचे संकट संपल्याच्या आविर्भावात वावरतांना दिसून आल्यात, तर कामावर जाणाऱ्या महिलांपैकी तरूणींचा उत्साह जास्त असल्याचे एकदंरीत चित्र होते.

धावत्या रेल्वेत जुंपली; जिगरबाज प्रवाशामुळे चोरट्यांचा बेत फसला

राज्य शासनाच्या प्रस्तावानंतर  केंद्र सरकारने सुद्धा बुधवारपासून सरसकट महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 वाजता नंतर मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये  महिलांची गर्दी दिसून आली. यामध्ये प्रामुख्याने खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी, शासकीय कर्मचारी, छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांचा समावेश होता. तर महाविद्यालय, शिकवण्या बंद असतांनाही, गेल्या सात महिन्यांपासून घरातच राहत असलेल्या तरुणींही लोकल प्रवासाच्या माध्यमातून मोकळा श्वास घेतला. 

सध्या नवरात्री असल्याने, महिलांचे उपवास असतात. त्यामूळे महिला शक्यतो प्रवास टाळत असतात. मात्र महिलांची ही गर्दी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही  गर्दी सांभाळण्याचे आव्हान रेल्वेला  पेलावे लागणार आहे.

वांद्रे ते बोरीवली परिस्थिती
या मार्गादरम्यान महिलांची तुरळक गर्दी होती. नेहमीप्रमाणे डब्यांमधील आसनांवर महिला बसल्या असल्या तरी, उभ्या राहणाऱ्यां महिला प्रवाशांची संख्याही तेवढीच होती. मात्र, नेहमीप्रमाणे डब्ब्यात होणारी धक्काबुकी किंवा धावपळ दिसून आली नाही.

दादर कुर्ला मार्गावरील परिस्थिती
या मार्गावर लोकलमध्ये कायम प्रवाशांची प्रचंड गर्दी असते, मात्र, पहिल्याच दिवशी महिलांची फारशी गर्दी दिसून आली नाही. रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकलमध्ये जागा पकडण्यासाठी नेहमीची धावपळ करतांनाचं चित्र होते. मात्र, तुरळक गर्दी वगळता, या मार्गावरून महिला बसून प्रवास करतांना दिसून आल्या. 

चर्चेगट ते विरार मार्गावरी परिस्थितीत
या मार्गावरची गर्दीचे चित्र कायम होते. कामावर जाणाऱ्या महिला, तरूणी यांची तोबा गर्दी झाली होती. लोकल सुरू झाल्याने कोरोनावर आपण मात केली की काय ? अशा आवीर्भावात अनेक युवती दिसून आल्यात, महाविद्यालय, शिकवण्या सर्व बंद असतांना, सरसकट लोकल प्रवासाच्या पहिल्याच दिवशी, सर्वात जास्त पश्चिम रेल्वे मार्गावर तरूण मुलींचा जल्लोश दिसून आला. 

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीत फसवणूक; भाजपची राज्यपालांकडे तक्रार

तिकीट खिडक्यांपुढे रांगा
तब्बल सात महिन्यानंतर सरसकट महिला प्रवाशांसाठी लोकल प्रवासाला परवानगी मिळाल्याने, पास, तिकीट नसल्याने, अनेकांनी सकाळी 9 वाजताच रेल्वे स्थानकांवर हजेरी लावली होती. मात्र, गर्दी वाढतच गेल्याने अखेर मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गावर तिकीट आणि पास काढण्यासाठी रांगा दिसून आल्या, दरम्यान महिलांची गर्दी आणि रांगा लागत असल्याने रेल्वेच्या महिला पोलीसांना दिवसभरासाठी तिकीट खिडक्यांसमोरील रांगा सांभाळण्यासाठी तैनात करण्यात आले होते. 

माध्यमांना नो एंन्ट्री  
बुधवारी विशिष्ट वेळेत सरसकट महिलांना प्रवेश देण्याची रेल्वे मंत्रालयाने घोषणा केल्यानंतर त्याचे छायाचित्रण करण्यासाठी फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर यांनी रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमांना  मिडीयाला परवानगी नसल्याचे सांगत आरपीएफने प्रवेश नाकारला 

 

महिलांच्या लोकल प्रवासाचा पहिलाच दिवस होता. त्यासाठी जिआरपी आणि आरपीएफच्या जवानांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये ही गर्दी वाढण्याची शक्यता वाढत असल्याने, त्यासाठी जिआरपी, आरपीएफ कडक बंदोबस्तचे नियोजन केले जाणार आहे. 
- के के अशरफ,
आयुक्त, आरपीएफ 

 

रेल्वे आणि राज्य सरकारने महिलांना चुकीच्या वेळेत प्रवासाची परवानगी दिली आहे. दोन शिफ्ट मध्ये खासगी काम करणाऱ्या महिलांना लोकल प्रवास अडचणीचा ठरणार आहे. पहिल्या शिफ्टसाठी सकाळीच कामावर पोहचावे लागते तर, दुसऱ्या शिफ्टच्या लांब पल्यांवरील महिला कामगारांना सुद्धा अडचण होत आहे. 
- मोनीका कनेरी,
रेल्वे प्रवासी

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women on the local train on the first day Queues of women to get tickets passes