फेरीबोटीतही महिलांसाठी तीन जागा आरक्षित

- मंगेश सौंदाळकर
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - मेट्रो, रेल्वे आणि बसमध्ये महिलांसाठी काही जागा आरक्षित असतात. आता फेरीबोटीमध्येही महिलांसाठी तीन जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) हा निर्णय घेतला आहे.

मुंबई - मेट्रो, रेल्वे आणि बसमध्ये महिलांसाठी काही जागा आरक्षित असतात. आता फेरीबोटीमध्येही महिलांसाठी तीन जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) हा निर्णय घेतला आहे.

एमएमबीच्या आकडेवारीनुसार वर्षाला 30 टक्के महिला सागरी प्रवास करतात. भरती असेल, तर बोटी हेलकावे खातात. ते निमित्त साधून काही आंबटशौकीन महिलांना नकोसे स्पर्श करतात. अशा परिस्थितीत बोटीतील महिलांना हक्काची जागा मिळावी आणि त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी त्यांना काही जागा आरक्षित ठेवण्याच्या मुद्‌द्‌यावर नुकतीच "एमएमबी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. सरसकट काही जागा महिलांना आरक्षित ठेवल्यास बोटमालकांचा विरोध होईल, असाही मुद्दा चर्चेला आला. त्यामुळे मेट्रो, बेस्ट आणि रेल्वेप्रमाणेच राज्यातील सर्व फेरीबोटींमध्ये सलग तीन जागा महिलांकरता आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कित्येकदा परराज्यांतील आणि परदेशातील महिला एकट्याच जलप्रवास करतात. गेट वे ते एलिफंटा या प्रवासात महिला पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यांना आरक्षणामुळे हक्काची जागा मिळेल. मोरा जेटीहून भाऊचा धक्का येथे मासेविक्रीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. तसेच अलिबागहून मुंबईत येणाऱ्या नोकरदार महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या महिलांना आरक्षणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल.

महिला दिनाची सफर
"एमएमबी'च्या वतीने यंदा प्रथमच महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त 8 मार्चला गेट वे ते एलिफंटादरम्यान महिलांकरता विशेष निःशुल्क फेरीबोट सेवा चालवण्याचा प्रयत्न आहे. अशी फेरी चालवण्याची विनंती एमएमबीने बोटमालक असोसिएशनला केली आहे.

फेरीबोटींमध्येही सलग तीन जागा महिलांकरता आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सागरी मंडळाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहेत. आरक्षित जागांमुळे महिलांना दिलासा मिळेल.
- अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ.

Web Title: women reserve seat in boat