सोशल डिस्टन्सिंग शब्दामुळे पुन्हा गुलामीची भावना, वाचा कोण म्हटलंयं अस 

file photo
file photo

मुंबई ः सोशल डिस्टन्सिंग या शब्दाचा वास दोन हजार वर्षांपासून आहे. जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्‍यता म्हणजे विशिष्ट समाजापासून सामाजिक अंतर राखले जाते. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग या शब्द प्रयोगाचा वापर केला जायचा. संविधानाने अस्पृश्‍यता संपुष्टात आणली आणि समाजात वास करून असलेल्या सोशल डिस्टन्सिंग च्या कुप्रथेला कायमची मूठमाती दिली. सोशल डिस्टन्सिंगची नाही तर सोशल कनेक्‍शनची गरज लॉकडाऊनच्या काळात आहे. सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा अधिक योग्य शब्द आहे. जगभरच्या अनेक समाज शास्त्रज्ञ यांनी याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर आता डब्ल्यूएचओनेही 20 मार्च पासून हा शब्द वापरणे बंद केले आणि सोशल कनेक्‍टनेस विथ फिजिकल डिस्टन्सिंग या नवीन शब्द प्रयोगाला सुरूवात केली. त्याप्रमाणे भारतातनेही सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग किंवा कोरोना डिस्टन्सिंग या शब्दांचा वापर करावा, असे आवाहन भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पत्र लिहून पंतप्राधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.


फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे संशयित रुग्ण आणि इतर यांच्यामध्ये संक्रमण होणार नाही इतके अंतर ठेवणे. यासाठी हवं तर कोरोना डिस्टन्सिंग असा थेट शब्दप्रयोग करणे अधिक युक्त ठरेल. जाती प्रथेची सगळी उतरंड, उच्च निचतेची प्रथा सोशल डिस्टन्सिंगच्या सूत्रावर बांधली गेली आहे. म्हणून प्रसार माध्यमांनी हा शब्द प्रयोग थांबवला पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले. 

कोरोनाला धर्म चिकटला 
कोरोनाच्या निमित्ताने सोशल कनेक्‍टची अधिक गरज असताना दिल्लीच्या तबलीग मरकज मधील एका घटनेचे निमित्त करून संबंध कोरोनाला धर्म चिटकवण्याचा जो अश्‍लाघ्य प्रयत्न झाला तोही वेदनादायक आणि क्‍लेशदायक आहे. कोरोनाच्या प्रसाराला कोणत्याच जाती, धर्माचं, प्रांतांचं, भाषेचं आणि देशाचं बंधन राहिलेले नाही. या साऱ्या सीमा ओलांडून आज जग कोरोनाच्या विळख्यात गेले आहे. त्यामुळे त्याला धर्म चिकटवणे हे निव्वळ अशास्त्रीयच आहे. तरीही राळ उठवण्यात आली. ते रोखण्यासाठी या देशाचे संविधानिक प्रमुख या नात्याने पंतप्रधान म्हणून पुढाकार घेणे अपेक्षित आहे, असे देवी यांनी पत्रात म्हटले आहे. 

देशबांधवांना आश्वस्त करण्याची मागणी 
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्‍य म्हणजे दलित समाजाने दोन हजार वर्षे हा अपमान भोगला आणि त्याची मोठी किंमत या देशाला चुकवावी लागली. ही अस्पृश्‍यता आता मुस्लिम समाजाच्या आणि नॉर्थ ईस्टच्या वाट्याला येण्याचा धोका आहे. देशाची एकता आणि संविधानाने मिळालेले आश्वासन याला यामुळे सुरुंग लागतो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण पुढाकार घ्यावा. द्वेष व हेटाळणीचे शिकार झालेल्या देशबांधवांना आश्वस्त करावे अशी विनंती देवी यांनी केली. 

शहरात अडकून पडलेल्यांचा विचार करा 
देशाने आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांकडे केलेलं कमालीचे दुर्लक्ष तसेच देशाच्या आर्थिक नियोजनात यासाठी करण्यात येणारी नगण्य तरतूद यामुळेच आज आपल्याला टेस्टिंगपेक्षा लॉकडाऊन हा उपाय जवळचा वाटतो आहे. यापुढे तरी आरोग्य आणि शिक्षणात सर्वाधिक खर्च करणे, त्याबरोबरच या क्षेत्रांमध्ये खाजगीकरणाला नकार देणे याचा विचार पंतप्रधानांनी करावा, असे देवींनी पत्रात म्हटले आहे. त शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसान व शहरात अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांची परिस्थितीबाबत सरकारने वेळीच निर्णय घ्यावा, याचाही उल्लेख गणेश देवी यांनी पत्रात केला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com