आता कसे जाणार कोकणात?

आता कसे जाणार कोकणात?


नवी मुंबई, अलिबाग : लॉकडाऊनमुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे त्याची मुदत पुन्हा वाढवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत या मार्गाचे 70 टक्के काम झाल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी करत असले तरी या मार्गाची आणखी काही वर्षे रखडपट्टी होणार हे निश्‍चित आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यात पेण, रामवाडी, सुकेळीखिंड, नागोठणे, कोलाड येथे काही प्रमाणात काम सुरू आहे. माणगाव तालुक्‍यात जमीन संपादनाचा महत्त्वाचा अडथळा कायम आहे. त्याचबरोबर काही पुलांचेही काम शिल्लक आहे. आता लॉकडाऊनमुळे हे काम थंडावले आहे. 

कामगारांअभावी कामाचा वेग मंदावला 
सध्या महामार्गावरील वाहतूक कमी असल्याने वेगाने काम करणे शक्‍य होते. तसेच विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी महामार्गाचे काम सुरू करण्याचे आदेशही दिले असले, तरी कामगारांअभावी कामाला अद्याप वेग आलेला नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंतची डेडलाईन पाळणे शक्‍य नसल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे. 
 
मुंबई-पुणे मार्गासाठी पुढील आठवड्याचा मुहूर्त 

मुंबई-पुणे द्रुतगती जलद महामार्ग, मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचेही काम धीम्या गतीने सुरू आहे. पुढील आठवड्यात या कामांना वेग येणार असल्याचे एमएसआरडीसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मुंबई-पुणे जलदगती आणि जुन्या महामार्गांवर कोरोनामुळे उपलब्ध असणाऱ्या कामगारांमध्ये गटारांची स्वच्छता, वाढलेली झुडपे छाटणी, संरक्षक कठडे दुरुस्त करणे, खचलेल्या भागात डांबरीकरण करणे आदी लहान कामे केली जात आहेत. पुढील आठवड्यात मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर या कामांना अधिक वेग येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी दिली.


सायन-पनवेल मार्गावरील कामे ठप्प 
सायन-पनवेल महामार्गावरील पावसाळी कामे पूर्णपणे बंद आहेत. अद्याप सरकारने या कामांना मंजुरी न दिल्यामुळे कामे बंद ठेवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी दिली. तसेच या मार्गावर गेले वर्षभरापासून कॉंक्रिटीकरण सुरू होते. 97 टक्के कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. फक्त तुर्भे उड्डाणपुलाखाली रस्ता शिल्लक आहे. तसेच नेरूळ उड्डाणपूल आणि सीबीडी-बेलापूर उड्डाणपुलावरील एका बाजूचे कॉंक्रिटीकरण थांबवण्यात आले आहे. एमएसआरडीसीने या उड्डाणपुलावर कॉंक्रिटीकरण करण्याचे पैसे न दिल्यामुळे हे काम थांबवण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. महामार्गावर पावसाळ्यापूर्वी कामे करण्यास अंदाजे 60 ते 70 लाख रुपयांचा खर्च येतो. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात पावसाळ्यात खंड पडू नये, म्हणून खोदाईची कामे सुरू आहेत. कुंडलिका नदीवरील जुना पूलदेखील पाडण्यात आला आहे. काही महत्त्वाचे काम अपूर्ण आहे. ते पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न आहे. हे काम लॉकडाऊनमुळे मंदावले आहे. 
- सुरेश फेगडे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. 
 

महामार्गावरील सुकेळी खिंडीतील काम वन विभागामुळे बंद होते. त्याला परवानगी मिळाली आहे. माणगाव तालुक्‍यात भूसंपादनाची समस्या आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ही समस्या दूर केली जात आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष कामात व्यत्यय आलेला आहे. 
- सुनील तटकरे, खासदार, रायगड. 
.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com