कामगारांचा "कोकाकोला'विरोधात एल्गार; कंपनीचे काम पाडले बंद

दिलीप पाटील
Monday, 30 November 2020

कोकाकोला कंपनीतील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने रद्द केला असून या ठेकेदारांचे 131 कामगार असून या कामगारांना दुसऱ्या ठेक्‍यात टाकण्यात आले आहे.

वाडा ः कोकाकोला कंपनीतील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने रद्द केला असून या ठेकेदारांचे 131 कामगार असून या कामगारांना दुसऱ्या ठेक्‍यात टाकण्यात आले आहे. पहिल्या ठेकेदाराचा राजीनामा देऊन पुन्हा नव्याने दुसऱ्या ठेकेदाराकडे काम करण्यास सुरुवात करावी, असे कंपनीचे म्हणणे आहे; तर पूर्वी केलेल्या कामाची सेवा खंडित न करता नवीन ठेकेदाराकडे काम करण्यास कामगार तयार आहेत. या वादामुळे कामगार व कंपनीचे एकमत होत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी आज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह आंदोलन सुरू करून कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे. 

हेही वाचा - भाईंदरमध्ये राजकीय बदलाचे संकेत; भाजपमधून राष्ट्रवादीत इनकमिंग वाढणार

तालुक्‍यातील कुडूस या ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोकाकोला ही शीतपेयांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत शेकडो कामगार काम करीत आहेत. कंपनीत कायमस्वरूपी कामगार वगळता 330 कंत्राटी कामगार आहेत. कंपनीत एकूण चार ठेकेदार होते. त्यातील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने 1 नोव्हेंबर 2020 पासून रद्द केला आहे. रद्द केलेल्या दोन ठेकेदाराकडे 131 कामगार आहेत. 

हेही वाचा - रायगडच्या जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट तब्बल सात वर्षांनंतर सुरू; सामाजिक संस्थांचा पाठपुरावा

या प्रकरणी कामगारांनी स्थानिक कामगार संघ या कामगार संघटनेच्या झेंड्याखाली कंपनी व्यवस्थापक, उपकामगार आयुक्त यांच्याकडे याबाबत न्याय मागितला; मात्र त्यांना कुठलेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी आज कुटुंबासह कंपनीच्या दोनही प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू करून येण्या-जाण्याचा मार्ग अडविल्याने कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे. या बंदमुळे कंपनीचे कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत गोरे यांच्याशी वारंवार दूरध्वनी वरून संपर्क साधूनदेखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

 

कंत्राटी कामगार हे गेल्या अठरा ते वीस वर्षांपासून कंपनीत काम करीत आहेत. त्यांची पूर्वीची सेवा खंडित केल्यास त्यांच्या आत्ताच्या वेतनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे एकही कामगार राजीनामा देणार नसून नव्याने नेमणूक पत्र स्वीकारणार नाहीत. कंपनीच्या धोरणाला आम्ही विरोध केला आहे. न्याय मिळेपर्यंत कामगारांचे आंदोलन सुरू राहील. 
- राजेश सावंत,
संयुक्त सचिव, स्थानिक कामगार संघ 

 

कारखान्यात कंत्राटाद्वारे तैनात केलेल्या कंत्राटी कामगारांची संख्या उत्पादन गरजांच्या आधारे वेगवेगळी असते. जी हंगामी आणि आमच्या उत्पादकांच्या मागणीशी थेट जोडलेला आहे. आम्ही अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या सर्व नियम आणि आवश्‍यकतांचे पूर्ण पालन करतो. या विषयावर लक्ष देण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी सध्या चर्चा करीत आहोत. आम्ही लवकरच हा विषय निकाली काढू 
श्रेयस शर्मा,
प्रसिद्धी प्रमुख, कोकाकोला कंपनी

The company has canceled the contracts of two Coca-Cola contractors 131 of whom have been relocated 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers strike against Coca-Cola in vada palghar