World Stroke Day : तरुणांमध्ये पक्षाघाताच्या प्रमाणात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Stroke Day 2022 Increase stroke rates among youth health mumbai

World Stroke Day : तरुणांमध्ये पक्षाघाताच्या प्रमाणात वाढ

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात मध्यमवयीन प्रौढांमध्ये पक्षाघाताचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत असल्याचे सांगितले जात आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, धूम्रपान आणि मद्यपान यांसारखे घटक पक्षाघातासाठी कारणीभूत असू शकतात. अस्पष्ट बोलणे, चेहरा सुन्न होणे आणि हात-पाय लुळे पडणे अशी स्ट्रोकची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर मात करता येते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. २९ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पक्षाघात दिन’ म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर या आजाराविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

जेव्हा उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटतात किंवा कोलेस्ट्रॉल साचून रक्तवाहिन्यांच्या भिंती अरुंद होऊन मेंदूला रक्तपुरवठा रोखला जातो तेव्हा पक्षाघात येतो. मधुमेह, अनियंत्रित उच्च रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, मद्यपान, अपघातामुळे झालेला आघात, रक्तवाहिन्यांच्या भिंतींच्या कमकुवत होणे, तसेच फुगवटा येणे, कौटुंबिक इतिहास, व्यायामाचा अभाव यांसारखे काही घटक पक्षाघातासाठी कारण ठरतात. बेकायदेशीर औषधांच्या वापरामुळे ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढू शकते, अशी माहिती न्युरोलॉजिस्ट डॉ. अनिल व्यंकटचलम यांनी दिली.

शारीरिक हालचाली न करणे, स्लीप एपनिया, चरबीयुक्त पदार्थांचे सेवन आणि तणाव यांसारख्या चुकीच्या जीवनशैलीमुळे ३५ ते ५५ वयोगटातील व्यक्तींमध्ये पक्षाघाताचे प्रमाण वाढत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना पक्षाघाताचा झटका आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

२० टक्के रुग्ण चाळीशीतील

मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास स्ट्रोक येतो. इस्केमिक स्ट्रोक (रक्त गोठण्यामुळे) आणि रक्तस्राव स्ट्रोक (रक्तवाहिन्या फुटल्यामुळे) होणारा स्ट्रोक असे याचे दोन प्रकार आहेत. भारतात दरवर्षी १.८ दशलक्ष लोकांना पक्षाघाताचा झटका येतो. यातील ६० ते ७० टक्के रुग्ण कायमस्वरूपी अपंग होतात, तर काही जणांचा इतर व्याधीमुळे मृत्यू होतो. एका सर्वेक्षणानुसार गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात १ लाख लोकसंख्येमागे १९४ नागरिक पक्षाघाताने मृत्युमुखी पडतात; तर पंजाबमध्ये लुधियाना जवळच्या ग्रामीण भागात हेच प्रमाण २१० इतके आहे. देशातील २० टक्के पक्षाघाताचे रुग्ण हे ४० पेक्षा कमी वयाचे आहेत, असे मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. रवी सांगळे यांनी सांगितले.