आई मला मरू दे !

आई मला मरू दे !

मुंबई - आई मला मरू दे.... अडीच महिन्यांपूर्वी हे वाक्‍य उच्चारल्यानंतर आकडी आल्याने 17 वर्षांचा यश सिंह शून्यातच गेला. तेव्हापासून उघडे असलेले त्याचे तोंड एकदाही बंद झालेले नाही. यशवर उपचार करण्यासाठी त्याची आई वरुणा वाराणसी येथून त्याला घेऊन मुंबईत आली. महिनाभरापासून शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण त्यासाठी येणारा महिन्याचा खर्च 45 हजारांहून अधिक आहे. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने तो झेपत नसल्याने या माऊलीवर भिक्षेकऱ्यासारखे जीवन जगाने लागत आहेत. रोज केवळ एक वेळ जेवत आहे. पण काहीही झाले तरी माझा मुलगा बरा झाल्यानंतरच घरी जाणार, हा निर्धार वरुणा यांनी केला आहे. 

यश विल्सन या अनुवांशिक आजाराने त्रस्त आहे. दहाव्या वर्षी त्याला हा आजार जडला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी महिन्याला किमान 40-45 हजार रुपयांचे खर्च होतो. सुरुवातील त्याच्या वडिलांनी वरुणा यांना साथ दिली; मात्र नंतर तेही सोडून गेले. माहेरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांच्याकडून फारशी मदत मिळत नाही; मात्र हिंमत न हरता वरुणा यांनी मिळेल ते काम करून यशवर उपचार करत होत्या. पैसे पुरत नसल्याने यशला औषधे योग्य प्रमाणात मिळत नसत. 

एक दिवस यशला भूक आवरत नव्हती. पण घरात मसुरच्या डाळीशिवाय काहीही नव्हते. ही डाळ "विल्सन' झालेल्या रुग्णांसाठी जणू विषच! पण नाईलाजाने वरुणा यांनी त्याला डाळ दिली. तेव्हापासून त्याचा आजार बळावला. अडीच महिन्यांपूर्वी आकडी आल्यापासून यशचे तोंड उघडेच आहे. सुरुवातीला महिना-दीड महिना पैशांअभावी यशवर उपचार करता आले नाहीत; मात्र त्याला अशा अवस्थेत ठेवण्यास वरुणा यांचे आईचे काळीज तयार नव्हते. त्यामुळे मिळेल तेथून मदत गोळा करून त्या यशला घेऊन शीव रुग्णालयात आल्या; पण हाताशी असलेले पैसे अवघ्या 10 - 15 दिवसांत संपले. तेव्हापासून त्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. 

औषधांचा खर्च रुग्णालयातील वैद्यकीय समाजसेवक जमा करतात. औषधाचा खर्च भागत असला तरी लहान-मोठा खर्च असतोच. त्यासाठी वरुणा यांना लोकांसमोर हात पसरावे लागत आहेत. एका वेळच्या जेवणासाठी त्यांना मुंबईतील नातेवाईकावर अवलंबून रहावे लागते. वाराणसीत असताना यशवरी उपचाराकरिता पैसे कमवण्यासाठी त्या घराबाहेर पडत. पण आता मुंबईत ते शक्‍य होत नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसारखे काडी काडी जोडून त्या मुलाच्या आणि स्वत:च्या रोजच्या गरजा पूर्ण करत आहे. 

यश सर्वसामान्यांसारखे जीवन जगू शकतो; पण त्याला आयुष्यभर उपचार घ्यावे लागतील. तो उपचारांनाही योग्य साथ देत आहे. रुग्णालयात आणण्यात आठवडाभराचा उशीर झाला असता तर त्याला वाचवणे शक्‍य नव्हते. 
-डॉ.आकाश शुक्‍ला, प्रमुख गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभाग, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव 

विल्सनबाबत... 

हा दुर्मिळ अनुवांशिक आजार आहे. या आजारात शरीरातील तांब्याचे प्रमाण वाढते. संबंधित रुग्णाला तांब्याचा अंश नसलेले पदार्थ खावे लागतात. यशच्या कुटुंबात तीन चार पिढ्यांमध्ये हा आजार कुणालाही झाला नव्हता. त्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला तो झाला असावा, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. 

यश हिंमत हरला असला तरी मी नाही. मुलाला जगवण्यासाठीच मी जिवंत आहे. मी हिंमत हरणार नाही. कोणत्याही परीस्थितीत यश बरा झाल्यानंतच घरी जाईन. 
- वरुणा सिंह

काय आहे विल्सन आजार 

विल्सन हा अनुवांशिक आजार असून, जीन्सच्या माध्यमातून हा रोग पुढच्या पिढीत येतो. या आजारांत शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होते. रक्तात तांब्याचे प्रमाण वाढत सुरुवातीला यकृत, मेंदू, हृदय आणि हळूहळू संपूर्ण अवयवांत जाऊन पोहोचते. 

या आजारांत वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदूतही तांब्याचे प्रमाण चढत गेले  की रुग्णाच्या जिवालाही धोका पोहोचतो. उपचार थांबल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता आहे. 
हा आजार तीस हजार रुग्णांपैकी एकाला होतो. हा आजार पूर्णपणे बरा होतो. परंतु शरीरातील तांब्याचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी त्याला कायमस्वरुपी औषध आणि डाएट अन्नावरच जगावं लागेल.

यशला मदत करण्यासाठी धनादेश या नावाने काढावा

डीन, पुअर बॉक्स चॅरिटी फंड, एल.टी.एम.जी. हॉस्पिटल

बँकेचे नाव - द म्युनिसिपल कॉ-अॉपरेटीव्ह बँक लिमिटेड, मुंबई

शाखेचे नाव - सायन हॉस्पिटल

शाखेचा पत्ता - एल.टी.एम.जी. रुग्णालय, महाविद्यालय इमारत, शीव, ४०० ०२२

एनइएफटी अायएफसीकोड -  एमयूबीएल०००००१८

खाते क्रमांक - ०००१०११८०००५८२३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com