उपचारातील अडथळ्यांनी यशची परवड 

उपचारातील अडथळ्यांनी यशची परवड 

मुंबई - महिनाभरापूर्वी यशला आणले त्या वेळी त्याची अवस्था खूपच बिकट होती. अजून काही दिवसांचा विलंब यशच्या जीवावरही बेतला असता. त्याच्या उपचारांत सातत्य असते, तर तो स्वतःच्या पायांवर उभा असता, अशी खंत यशवर चार वर्षांपासून उपचार करणारे टिळक रुग्णालयातील गॅस्ट्रेएन्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अभय शुक्‍ला यांनी व्यक्त केली. यशच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा बरीच सुधारणा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

यशला योग्य उपचार मिळावे यासाठी पहिली दोन वर्षे वरुणा सिंह यांची विविध रुग्णालयांत धावपळ सुरू होती. दिल्लीला नेल्यावर यशच्या अवस्थेत थोडी सुधारणा झाली; परंतु तेथे फार काळ आम्हाला थांबता आले नाही. यशच्या उपचारांवर पाण्यासारखा पैसा खर्च झाल्याने घरात वादही वाढत होते. यश बरा होईल, त्याला कायमस्वरूपी आजार नाही, अशी थाप मारली नसती, तर पतीने आणि सासरच्या मंडळींनी कधीच पैसे दिले नसते, अशी कबुली वरुणा सिंह यांनी दिली. 

वाराणसी, दिल्लीतील खासगी रुग्णालय... पुन्हा वाराणसी असे आम्ही भटकत होतो. परंतु, यश बरा होत नव्हता. यशचा आजार मेंदूपर्यंत शिरला होता. त्यामुळे आम्ही पैशांची जमवाजमव करून 13 वर्षांच्या या मुलासह मुंबई गाठली. मुंबईत त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्या वेळी त्याला आसनावर बसता येणे शक्‍य होते. नवऱ्याची साथ सुटल्यानंतरही आतापर्यंतचे उपचार माझ्या कामावरील सहकारी आणि यशच्या मित्रपरिवारातून शक्‍य झाले, असे वरुणा यांनी सांगितले. अडीच महिन्यांपूर्वी यशची अवस्था आणखी बिघडली. आकडी आलेल्या यशला घेऊन वरुणा यांनी पुन्हा सहकारी व यशच्या मित्रपरिवाराकडे पैसे मागून दीड महिन्यापूर्वी मुंबई गाठली. आता टिळक रुग्णालय उपचारांचा निम्मा खर्च उचलत आहे. उपचारांसाठी 100 टक्के मदत मिळाली, तर यश लवकर बरा होईल, अशी आशा वरुणा यांनी व्यक्त केली. 

काय आहे विल्सन आजार 
विल्सन हा अनुवांशिक आजार असून, जीन्सच्या माध्यमातून हा रोग पुढच्या पिढीत येतो. 
या आजारांत शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त होते. रक्तात तांब्याचे प्रमाण वाढत सुरुवातीला यकृत, मेंदू, हृदय आणि हळूहळू संपूर्ण अवयवांत जाऊन पोहोचते. 
या आजारांत वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदूतही तांब्याचे प्रमाण चढत गेले  की रुग्णाच्या जिवालाही धोका पोहोचतो. उपचार थांबल्यास रुग्ण दगावण्याचीही शक्यता आहे. 
हा आजार तीस हजार रुग्णांपैकी एकाला होतो.   
हा आजार पूर्णपणे बरा होतो परंतु शरीरातील तांब्याचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी त्याला कायमस्वरुपी औषध आणि डाएट अन्नावरच जगावं लागेल.

बेडसोल्समुळे किंकाळ्या 
अंथरुणाला खिळलेल्या यशला बेडसोल्समुळे असह्य वेदना होतात. डाव्या आणि उजव्या बाजूला यशला चार बेडसोलच्या जखमा झाल्या आहेत. कंबरेजवळच्या भागातील जखम व अन्य काही जखमा हाडापर्यंत गेल्या आहेत. त्यातील पू वाढला की यशला असह्य वेदना होतात. त्याच्या खालावलेल्या आवाजातील किंकाळ्याही वॉर्ड नंबर चार हेलावून टाकतात.
 

यशला मदत करण्यासाठी
धनादेश या नावाने काढावा
डीन, पुअर बॉक्स चॅरिटी फंड, एल.टी.एम.जी. हॉस्पिटल
बँकेचे नाव - द म्युनिसिपल कॉ-अॉपरेटीव्ह बँक लिमिटेड, मुंबई
शाखेचे नाव - सायन हॉस्पिटल
शाखेचा पत्ता - एल.टी.एम.जी. रुग्णालय, महाविद्यालय इमारत, शीव, ४०० ०२२
एनइएफटी अायएफसीकोड -  एमयूबीएल०००००१८
खाते क्रमांक - ०००१०११८०००५८२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com