‘यिन’चे आजपासून समर यूथ समिट

YIN-Summer-Youth-Summit
YIN-Summer-Youth-Summit

नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्‍तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यात शैक्षणिक संधीचा वेध या परिषदेतून घेतला जाणार आहे. 

तरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर ही परिषद होणार आहे. नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता या सोहळ्याचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीचे संस्थापक सुनील पाटील उपस्थित राहणार आहेत. 

स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी या परिषदेसाठी मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या परिषदांसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ कंपनीज हे सहप्रायोजक आहेत. महाराष्ट्र यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित प्रियंका यादव व एकता निराधार संघाचे संस्थापक सागर रेड्डी यांचे चर्चासत्र पहिल्या दिवशी (बुधवारी) सकाळी साडेदहाला होणार आहे. दुपारनंतर अभी ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक जितेंद्र जोशी, रांका ज्वेलर्सचे संचालक वास्तुपाल रांका, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीचे संस्थापक सुनील पाटील, क्‍लिअर संस्थेचे संचालक दीपक पवार, डास ऑफ शोअरचे व्यवस्थापकीय संचालक अशोक खाडे या तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी ९.३० वाजता पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. यामध्ये कॉर्पोरेट मार्गदर्शक डॉ. राम गुडगीला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नंतरच्या सत्रात पुण्यातील निलया एज्युकेशन ग्रुपचे निलय मेहता, प्राध्यापक राजेंद्र जऱ्हाड, सर्जन कॉलेज ऑफ डिझाइनचे व्यवस्थापकीय संचालक संतोष रासकर, डॉ. दीपक शिकारपूर, हॅशटॅग क्‍लोदिंगचे संचालक अमोल नाहर, प्राध्यापक शिवानंद सुब्रमण्यम, इंडिया फर्स्ट रोबोटिक्‍सचे संचालक विनय कुवर, डिजिटल आर्टचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विक्रम शर्मा या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. 

त्याच दिवशी संध्याकाळच्या सत्रात यूथ इंन्स्पिरेटर्स ऑवार्डने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सात विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. आमदार शशिकांत शिंदे, ओरियन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर, आमदार नरेंद्र पाटील, पल्लवी-अवीदा हॉटेलचे संचालक हिमांशू अगरवाल, अभिनेत्री मीरा जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य प्रयोजक निलया एज्युकेशन ग्रुप पुणे आणि सह प्रयोजक हॅशटॅग क्‍लोदिंग हे आहेत. 

अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता.१८) ‘सकाळ मनी’तर्फे माहिती देण्यात येणार आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद कुळे मार्गदर्शन करणार आहेत. मॅनेजमेंट गुरू चकोर गांधी यांच्या मार्गदर्शनाने हे सत्र पूर्ण होणार आहे. परिषदेच्या समारोप कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक संदीप वासलेकर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार बाळाराम पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

‘यिन’ची समर यूथ समिट कौतुकास्पद
जागतिक महासत्तेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जागतिक स्तरावर स्वीकारलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या मॉडेलची निवड केली पाहिजे. यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल. वंचित आणि गरजूंसाठीच्या कार्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठीही तो सर्वाधिक महत्त्वाचा आहे.

समाजात आजही असमानता आणि भेदभावाची खोलवर रुजलेली पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी युवकांच्या सक्रिय योगदानाची गरज आहे. आपल्या देशापुढे अन्न, पाणी, स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण आदींचे तगडे आव्हान आहे. स्वदेशी तंत्रज्ञान आणि यंत्रणा विकसित करून या समस्या सोडविण्यासाठी तरुणाईला योग्य दिशा द्यायला हवी. ‘सकाळ माध्यम समूहा’चा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) सारखा उपक्रम यादृष्टीने अगदी योग्य असून, यिन युवकांना आपली मते तसेच अपेक्षा व्यक्त करण्यास सक्षम बनवत आहे. युवकांमध्ये लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठीही यिन प्रयत्नशील आहे. युवकांमध्ये उद्योजकता आणि व्यावसायिकता रुजविण्यासाठी यिनने ‘समर यूथ समिट’चे आयोजन केले असून, यिनचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अभिनंदन करतो आणि समिटला सुयश चिंतितो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

समर यूथ समिट दिशादर्शक
यिनच्या समर यूथ समिटचे तिसरे संक्रमण पाहताना मला अतिशय अभिमान वाटतोय. आपल्या देशाचे सर्वांत मोठे बलस्थान असणाऱ्या युवाशक्तीला स्वत:ला शोधण्यासाठीची दिशा तसेच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याला माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. यिनच्या या समिटमधून वैचारिक नेतृत्व, प्रेरणा आणि करियरच्या संधींचा कॅलिडोस्कोप एकत्र गुंफल्याचाही मला अभिमान वाटतो. समर यूथ समिट युवकांना विधायकरीत्या गुंतवून कुतूहलाची बीजेही रोवत आहे. युवकांनो, तुम्हाला यश तसेच अपयशाचाही सामना करावा लागेल. तुम्ही दीर्घकाळ तुमच्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवत प्रामाणिक कष्ट केल्यास योग्य वेळी सर्वच गोष्टी तुमच्यासमोर हजर होतील. यिन नेटवर्कशी संवाद साधण्याचे आपले निमंत्रण आनंदाने स्वीकारणाऱ्या अनेक दिग्गज उद्योजकांचा जीवनसंघर्ष खरंच अविश्‍वसनीय असून, त्यांना प्रखर संघर्षाशिवाय यशाला गवसणी घालता आलेली नाही. सध्या आपण नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त ऑगस्ट २०१८ पासून संपूर्ण शहरासाठीचा कार्यक्रम हाती घेत आहोत. तुम्ही जुन-जुलैमध्ये या दृष्टीने तयार राहा. पुढील समर यूथ समिट तुमच्यासाठी मैलाचा नवा दगड ठरेल, असे आश्‍वासन देतो. या समिटचा भाग झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनाच भविष्यातील यशासाठी शुभेच्छा देतो.
- अभिजित पवार,  अध्यक्ष, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

‘यिन’च्या उपक्रमांना पाठिंबा
‘सकाळ माध्यम समूहा’चा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) हा अनोखा उपक्रम आहे. आपल्या देशाच्या भवितव्याला पुढील पिढीच आकार देईल. भारत हा युवकांचा देश असल्याने तरुण मनांना योग्य दिशा दाखविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच युवकांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी समर यूथ समिटसारखे उपक्रम हाती घेणाऱ्या यिनच्या पाठीशी मी सदैव उभा आहे.
- संदीप वासलेकर, अध्यक्ष, स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप

सकारात्मक बदलासाठी ‘यिन’ प्रयत्नशील 
‘यिन’ने मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रातील १२ शहरांमध्ये ‘समर यूथ समिट’चे आयोजन केले आहे. तरुण वयातच उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या युवकांना ‘यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड’नेही गौरविण्यात येणार आहे. युवकांमध्ये सकारात्मक आणि शाश्‍वत बदल घडविण्यासाठी ‘यिन’ अथक परिश्रम घेत आहे. 
- विनोद तावडे, युवक कल्याण आणि उच्च तंत्रशिक्षणमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com