उपवन तलावात युवक बुडाला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पोहण्यासाठी उतरलेल्या रजतचा तब्बल ९ तासानंतर मृतदेह शोधून काढण्यात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले.

ठाणे : सत्संगासाठी आईसोबत ठाण्यात आलेला १८ वर्षीय तरुण उपवन तलावात बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रजत रविकांत शुक्‍ला असे त्याचे नाव असून तो आयटीचा विद्यार्थी आहे. पोहण्यासाठी उतरलेल्या रजतचा तब्बल ९ तासानंतर मृतदेह शोधून काढण्यात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले. गेले काही दिवस रजत मानसिक तणावात होता. या घटनेप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

मूळचा उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहापूर येथील मृतक रजत शुक्‍ला ठाण्यात सत्संगाच्या कार्यक्रमासाठी आला होता. बुधवारी सकाळी रजत आपल्या आईसोबत उपवनच्या तलावावर आला होता; मात्र अचानक आईच्या नकळत रजत तलावात पोहण्यासाठी उतरला अन्‌ पाण्यात बुडाला. सदरची घटना उपवन येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी पाहून याची माहिती वर्तकनगर पोलिसांना दिली.

सकाळी ८ वाजल्यापासून त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. टीडीआरएफच्या टीमने शोधमोहिमेसाठी वॉटरप्रूफ कॅमेऱ्याचा वापर करून तब्बल नऊ तासांनी तलावातील मृतदेहाचा शोध घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man drowns in a lake